अनवाणी धावत रमाबाईंनी जिंकली ‘अमृत दौड’; ४७ वर्षीय महिलेच्या जिद्दीला टाळ्यांचा कडकडाट;
अंबाजोगाई- प्रतिनिधी
अंबाजोगाईमध्ये शनिवारी सकाळी मॅरेथॉनची तयारी सुरू होती. कुणी वॉर्मअप करत होतं, तर कुणी बुटाच्या नाड्या आवळत शिट्टीची वाट पाहत होतं. त्याचवेळी साडी नेसलेली 47 वर्षीय रमाबाई रणवीर तिथे आल्या. शिट्टी वाजताच त्या धावू लागल्या आणि त्यांच्या वेगाने उपस्थितांना अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या परिसरात रमाबाईंच्या धावण्याला टाळ्यांचा कडकडाट मिळाला.
सुरुवातीला तरुण मुलं-मुली पुढे निघून गेले, मात्र रमाबाईंची धाव थांबली नाही. पायातील चप्पल वारंवार सटकत असल्याने त्यांनी अखेर चप्पल हातात घेतली आणि अनवाणी साडी सांभाळत धावायला सुरुवात केली. पावसामुळे गार झालेला रस्ता आणि वाटेतले खड्डे यांची पर्वा न करता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानगड बाबा चौकपर्यंतची ‘अमृत दौड’ पूर्ण केली आणि पहिला क्रमांक पटकावला. स्पर्धा जिंकल्यानंतर मेहनतीचं फळ मिळाल्याच्या आनंदाने रमाबाईंच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
मुळच्या हिंगोलीच्या असलेल्या रमाबाई पतीच्या निधनानंतर अंबाजोगाईत आल्या. मुलांना शिकवून मोठं करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली असून, त्या स्वयंपाकाचं काम करून लेकीच्या शिक्षणासाठी पैसे जमा करतात. “दररोज पोरांच्या संसारासाठी धावत असते, आज मी स्वतःसाठी धावले,” असं रमाबाईंनी सांगितलं. रोजच्या संघर्षात आयुष्याची शर्यत धावणाऱ्या रमाबाईंनी मॅरेथॉन जिंकून 3 हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं आणि त्यांच्या जिद्दीची कहाणी आता अंबाजोगाईत चर्चेचा विषय ठरली आहे.
