Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

पराभवाने पराभूत न होणारा खास मित्र…रमेश आडसकर — प्रसाद चिकशे यांच्या लेखनातून

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 19, 2026No Comments8 Mins Read

पराभवाने पराभूत न होणारा खास मित्र…रमेश आडसकर —

प्रसाद चिकशे यांच्या लेखनातून

 

बीड जिल्ह्याचे, नव्हे मराठवाड्याचे, नव्हे महाराष्ट्राचे, नव्हे तर देशाचे एक दिग्गज नेते म्हणजे गोपीनाथराव मुंडे.

जबरदस्त व्यक्तिमत्त्व, जबरदस्त प्रभाव, अफाट नियोजन, व्यापक लोकसंपर्क आणि निवडणुकीच्या तंत्र-मंत्राची विलक्षण जाण असलेला हा नेता.गोपीनाथराव मुंडे लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहणार, हे पक्के झाले होते. आता प्रश्न होता—विरोधी पक्षाकडून कोण उभे राहणार?

मुंबईच्या राष्ट्रवादी भवनामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांनी बीड जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री, दिग्गज नेते, आमदार, खासदार आणि जुन्या धुरिणांना बोलावले. पवार साहेबांनी त्यांच्यासमोर प्रश्न ठेवला—

“मी हा निर्णय घेण्यापेक्षा तुमच्यातला कोणी ही निवडणूक लढवायला तयार आहे का?”

पराभव जवळपास अटळ आहे, हे सगळ्यांनाच माहीत होते. प्रश्न एवढाच होता—पराभव दिसत असतानाही लढण्याची क्षमता, ताकद आणि इच्छाशक्ती कुणामध्ये आहे? पवार साहेबांनी प्रस्ताव समोर ठेवला. पण सगळीकडे शांतता होती. गोपीनाथरावांच्या विरोधात कोण उभे राहणार? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नव्हते. त्या मौनामध्ये नकार स्पष्ट दिसत होता. आणि अशा वेळी एक चाळिशीतला तरुण उभा राहतो.

हात वर करतो आणि म्हणतो—“मी उभा राहायला तयार आहे.”

क्षणभर सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळतात. पराभव होणार आहे, हे माहीत असूनही लढायला तयार होणे ही सामान्य गोष्ट नाही. त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती लागते, स्वतःवरचा विश्वास लागतो आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे पराभवाची भीती मनावर राज्य करू न देण्याची ताकद लागते. हा तरुण जर तुमचा जिगरी दोस्त असेल, लहानपणापासूनचा मित्र असेल, एका बाकावर तीन-चार वर्षे शेजारी बसून आयुष्याचे असंख्य दिवस घालवलेले असतील, दिवसाचे पाच-सहा तास एकत्र अनुभवलेले असतील, वर्गातील निवडणुका एकत्र लढलेल्या असतील, आनंदाचे क्षण अनुभवले असतील, भांडणं केली असतील, शिक्षकांकडून एकमेकांना मार खाल्ला असेल, एकत्र डबा खाल्ला असेल, एकत्र खेळले असतील, मिशीचंही वय आलेलं नसताना हाफ चड्डी घालून एकत्र फिरलेले असतील…

आणि हा मित्र कुठल्या बड्या व्यक्तीचा मुलगा म्हणून नव्हे, तर आपला खास दोस्त म्हणून तुमच्यासमोर उभा राहून देशपातळीवरील एका दिग्गज नेत्याच्या विरोधात लढण्याची तयारी दाखवत असेल, तर माझ्यासारख्या मित्राच्या मनात त्या क्षणी काय भावना निर्माण झाल्या असतील, याची कल्पना करणे अवघड नाही.

असा हा माझा मित्र—रमेश आडसकर.

प्रेमाने आम्ही त्याला म्हणायचो—रमेश. रमेशच्या आयुष्यातली पहिली निवडणूक आम्ही दोघांनी मिळून लढवली. तो वर्गप्रतिनिधी झाला आणि मी वर्ग मॉनिटर. आम्ही दोघांनी ती निवडणूक जिंकली. पुढची तीन वर्षे रमेश सतत वर्गप्रतिनिधी राहिला. रमेश म्हणजे बाबुराव आडसकरांसारख्या दिग्गज व्यक्तीचा मुलगा. पण एवढ्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा असूनही त्याच्या वागण्यात, मैत्रीत आणि रोजच्या जगण्यात एक विलक्षण सहजता होती. त्यामुळे रमेश कधी ‘बाबुराव आडसकरांचा मुलगा’ वाटला नाही; तो आपला रमेश वाटायचा.

त्याच्या लहानपणीचे अनेक किस्से मला आजही आठवतात.

दहावीची परीक्षा होती. जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही पेपर देत होतो. त्याच काळात अंबा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली होती आणि त्या दिवशी निकाल होता. बाबुराव आडसकरांचा विजय झाला होता. आंबेजोगाईतून ट्रकच्या ट्रक भरून लोक विजयाचा उत्सव साजरा करत जात होते. आमच्या जिल्हा परिषद शाळेसमोरून, शिवाजी चौकातून ते ट्रक जात होते. बाहेरचा जल्लोष, घोषणा, आवाज सगळं ऐकू येत होतं.

रमेशने आपला पेपर पूर्ण केला आणि झटदिशी बाहेर पडला! पेपर मात्र पूर्ण करूनच.

दहावीपर्यंत आम्ही दोघांनी आयुष्याचे कितीतरी अनुभव एकत्र घेतले. दहावीनंतर आमचे मार्ग थोडे वेगळे झाले. पण पुण्याच्या वैशालीमध्ये रमेशला भेटण्याचा योग आला. तेव्हा त्याच्याकडे पाहिलं आणि जाणवलं—आपला रमेश आता बदलला आहे!

खास मिशा, व्यवस्थित केलेले केस, नीटनेटकी केशरचना, बोलण्यात आलेली थोडीशी जरब आणि वाढलेला आत्मविश्वास… रमेशला त्या रूपात पाहून छान वाटलं.

रमेश अफाट क्रिकेट खेळायचा.क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी केज, धारूर, आडस अशा भागातून त्याची टीम ज्या पद्धतीने जायची, त्या सगळ्या गोष्टी रवी देशमुखांकडून ऐकल्या की रमेशच्या अचाट कारनाम्यांचा अंदाज येतो.

शाळेच्या काळात आम्ही सगळी पोरं अनेक मुलींच्या मागे लागायचो. त्याला आम्ही ‘लाइन मारणे’ म्हणायचो. पण त्या तीन वर्षांच्या काळात मी रमेशला कधीही कुठल्याही मुलीच्या मागे लाइन मारताना पाहिलं नाही. त्याने कुठल्याही मुलीला त्या अर्थाने त्रास दिला नाही. त्याने मजा केली, ऐश केली; पण इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने कधी वागला नाही.

नंतर रवीकडून तात्यांबद्दल—बाबुराव आडसकरांबद्दल—ऐकताना मला रमेशमधला हा संस्कार आणखी स्पष्ट दिसला.

रवी सांगतो, तात्या स्त्रियांच्या बाबतीत किती शिस्तबद्ध आणि सजग असायचे. एखादी महिला काम घेऊन आली तर त्यांची नजर कधीही वर नसायची. ते तिचं काम काय आहे, ते ऐकायचे, कागदांकडे पाहायचे आणि खाली पाहूनच बोलायचे. ती महिला जाईपर्यंत त्यांची नजर वर उठायची नाही.

मला वाटतं, हा संस्कार रमेशमध्ये खोलवर आलेला आहे. शाळेमध्ये आम्ही अनेक निवडणुका जिंकल्या होत्या. पण प्रत्यक्ष राजकारणात येण्याची वेळ आली तेव्हा त्याचा मोठा भाऊ अधिक ताकदीने राजकारणात उभा होता. रमेश त्या काळात प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय नव्हता.

पण अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आली आणि रमेशने पहिलं राजकीय मैदान गाठलं. त्या निवडणुकीत तो पडला. पुढेही तो अनेक निवडणुकांमध्ये पडला. पण त्याच्यातली एक गोष्ट कधीच बदलली नाही—जिद्द. तो पूर्ण ताकदीने निवडणूक लढवतो. जीव ओतून काम करतो. आणि निकाल नकारात्मक आला, तरी दुसऱ्याच दिवशी त्याच ताकदीने पुन्हा समाजात जातो. पराभवाचा परिणाम त्याला स्वतःवर होऊ देत नाही.

म्हणूनच माझ्यासाठी रमेश म्हणजे—पराभवाने पराभूत न होणारा रमेश.

रमेश मुत्सद्दी आहे. चतुर आहे. राजकारणातील बारकावे समजून घेण्याची त्याची हातोटी अफाट आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्याच्याकडे केवळ चार जागा आल्या होत्या. पण त्या चार जागांच्या जोरावर त्याने अतिशय चतुराईने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद पाच वर्षे भूषवले. एवढेच नव्हे, तर गोपीनाथराव मुंडेंसारख्या ताकदवान नेत्याच्या अनेक जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या बाजूला आणले आणि पुढच्या वेळी पुन्हा ते पद मिळवले.

रमेशचे दोन भाऊ—प्रकाश आणि मेघराज. पण तात्यांनी उभं केलेलं काम पुढे नेण्याची मोठी जबाबदारी रमेशच्या खांद्यावर आली. आणि त्याने ती केवळ सांभाळली नाही, तर वाढवली. केजमधली त्यांची ‘शारदा’ शाळा त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी रमेशने मला खास प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. वहिनी होत्या, मुलगा होता. त्याचा डान्स पाहिला. शाळेचं सगळं स्वरूप पाहिलं. सुरुवातीला जी स्टेज होती, तिथून आजच्या विस्तीर्ण स्वरूपापर्यंतचा प्रवास पाहिला. आज केज, धारूर, आडस आणि पंचक्रोशीमध्ये शारदासारखी उत्तम शाळा नाही, असं म्हणावं लागेल. अनेक अभ्यासक्रम त्यांनी सुरू केले. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात केवळ दोन शाळांना अशी संधी मिळाली—एक सुप्रियाताईंना आणि दुसरी रमेशरावांना. आपल्या भागात काम करण्याची हीच त्याची हातोटी आहे.

लोकांच्या प्रश्नांची त्याला जाण आहे. तो लोकांमध्ये जातो, त्यांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो. आणि या सगळ्या प्रवासात वहिनींची त्याला मिळणारी प्रचंड साथही महत्त्वाची आहे. राजकारणामध्ये मात्र निवडणूक आणि पद या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. निवडणूक लढवावी लागते. पद मिळवावं लागतं. कारण आपलं राजकारण हे लोकशाहीचं, आणि लोकशाही ही निवडणुकीवर उभी आहे.

रमेशने अनेक निवडणुका लढल्या. अनेक विजय मिळवले, अनेक पराभवही स्वीकारले. पण आमदारकी अजूनही त्याला थोडी हुलकावणी देत आहे. परवा तात्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्याचं भाषण ऐकत होतो. अतिशय सुरेख पद्धतीने तो एक विचार सांगत होता—

“आपल्याला जे मिळायचं असतं, ते योग्य वेळी मिळतंच. पण तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे.”

हा त्याचा पक्का विचार आहे. आणि मला तो फार महत्त्वाचा वाटतो. त्याला लोकांची समज आहे; तशीच स्वतःचीही समज आहे. लोकांच्या प्रश्नांची जाण आहे. अनेक लोक त्याच्यावर प्रेम करतात आणि तोही अनेकांवर तितक्याच मनापासून प्रेम करतो. अशा या वेगळ्या राजकारणी मित्राला आम्ही जेव्हा भेटतो, तेव्हा मैत्रीचा तोच जुना धागा आजही जाणवतो.

तो शंभर टक्के भेटणार. बोलणार. माझ्या स्टेटसवर, फेसबुकवर मी काही लिहिलं किंवा काही ठेवलं तर त्यावर आवर्जून प्रतिक्रिया देणार. काही कार्यक्रमांमध्ये आम्ही एकत्र जेवायला बसतो. आमची मैत्री अनेकांना माहीत आहे.

आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपमध्ये रवी देशमुखांशी—ज्यांची आई आसरडोहची सरपंच आहे—गप्पा मारत होतो.

रमेशच्या बाबतीत तो बरंच काही सांगत असतो. रवीला मी खूप प्रश्न विचारले, खूप क्रॉस क्वेश्चन्स विचारले. एका ठिकाणी न राहणारा, सारखे पक्ष बदलणारा असा रमेश—अशा गोष्टीही मी बोलत होतो. पण ज्या पद्धतीने रवी रमेशचा डिफेन्स करत होता, पूर्ण बुद्धीने, पूर्ण भावनेने ज्या पद्धतीने तो बोलत होता, ते पाहिल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली. असे जबरदस्त कार्यकर्ते रमेशचे आहेत, जे फक्त कामातून नाही, तर भावनेतून आणि विचारातून रमेशबरोबर आहेत. असे कार्यकर्ते मिळणं म्हणजे काय, त्या नेत्याची काय ताकद असू शकते, हे मला लक्षात आलं.

दुष्काळाच्या कामात रमेशच्या धारूर, आडस आणि केज परिसरातील अनेक गावांमध्ये आम्हाला एकत्र काम करता आलं. तो मला एखाद्या गावाबद्दल सांगायचा—

“इथे काम केलंस तर चांगलं होईल.”

अशा अनेक गावांमध्ये, कोळपिंपरीसारख्या गावांमध्ये आम्हाला एकत्र काम करता आलं.मित्र म्हणून रमेशबद्दल माझ्या भावना थोड्या जास्त सकारात्मक आहेत, हे मी मान्य करतो. कारण मी त्याला अगदी लहानपणापासून पाहिलं आहे.

गोटे गुरुजींच्या बोर्डिंगमध्ये शिस्तीत वाढताना पाहिलं आहे.आमदाराचा मुलगा असूनही अतिशय शिस्तप्रिय आणि कडक शिस्तीच्या गोटे गुरुजींच्या संस्कारात राहणं, ही काही साधी गोष्ट नव्हती. अनेक नेत्यांच्या मुलांच्या बाबतीत असं घडत नाही.पण रमेश तिथे वाढला.म्हणूनच त्याच्यातला एक गुण मला विशेष महत्त्वाचा वाटतो—पडूनही पुन्हा उभं राहण्याचा.पराभव येतो. तो स्वीकारतो. पण त्याला स्वतःची ओळख बनू देत नाही.

प्रमोद महाजनांचं एक वाक्य मला खूप आवडतं—

“You are not defeated unless you accept defeat.”

तुम्ही पराभव स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही पराभूत होत नाही.हे वाक्य तंतोतंत ज्याला लागू पडतं, तो म्हणजे—

आमचा रमेश.

लहानपणी माझ्यासोबत एका बाकावर बसलेला रमेश, वर्गप्रतिनिधी म्हणून पहिली निवडणूक जिंकणारा रमेश, तात्यांचा मुलगा म्हणून नव्हे तर माझा मित्र म्हणून माझ्यासमोर उभा राहणारा रमेश, मोठ्या नेत्याच्या विरोधात पराभव दिसत असतानाही “मी उभा राहतो” म्हणणारा रमेश आणि प्रत्येक पराभवानंतर नव्या ताकदीने समाजात परत जाणारा रमेश—

हा माझ्यासाठी केवळ एक राजकारणी नाही.हा माझा मित्र आहे. आणि म्हणूनच त्याच्याबद्दल बोलताना राजकारणापेक्षा मैत्रीचे शब्द जास्त येतात. कारण काही माणसांची ओळख त्यांच्या पदाने होत नाही. काही माणसांची ओळख त्यांच्या निवडणुकीच्या निकालाने होत नाही. त्यांची ओळख होते—ते किती वेळा पडले आणि प्रत्येक वेळी किती ताकदीने पुन्हा उभे राहिले, यावरून. त्या कसोटीवर माझा मित्र रमेश आडसकर आजही ठामपणे उभा आहे.

पराभवाने पराभूत न होणारा रमेश.

प्रसाद चिक्षे
8208438600

विजयराज आरकडे

Post Views: 59
विजयराज आरकडे

Related Posts

हारूनभाई इनामदार व सिताताई बनसोड यांची दर्जेदार कामासाठी संबंधितांना सूचना; कानडी रोडवरील नाल्याच्या कामाला गती;

September 2, 2026

कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थाचे प्रगत स्वरूप —- प्रोफेसर मनसाफ आलम

September 1, 2026

अनवाणी धावत रमाबाईंनी जिंकली ‘अमृत दौड’; ४७ वर्षीय महिलेच्या जिद्दीला टाळ्यांचा कडकडाट;

September 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 0 5 0
Total Users : 149050
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.