जनावरे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याला तहसिलदार गिड्डे यांनी दिला ऑन दी स्पॉट मदतीचा धनादेश
चिखल तुडवीत आणि पाण्यात वाट काढीत तहसीलदार शेतकऱ्यांच्या मदतीला धावले
गौतम बचुटे/केज :-
विविध राजकीय पक्षाचे पुढारी आणि नेते हे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलास देऊन त्यांचे मनोबल वाढवून मानसिक आधार देण्याचे काम करीत आहेत. तसेच केजचे तहसीलदार यांनी सुद्धा चिखल तुडवीत आणि पाण्यातून काट्या काट्याचा रस्ता तुडवीत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवीत आहेत.
केज तालुक्यातील एका शेतकऱ्यांचे म्हशी आणि गाय पाण्यात अडकलेली असताना त्यांना वाचविण्यासाठी दिवसभर आटोकाट प्रयत्न करूनही त्यातील तीन जनावरे दगावली. त्या शेतकऱ्याला तहसिलदार यांनी ऑन दी स्पॉट मदतीचा धनादेश देऊन दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
केज तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेलेली असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. तसेच मांजरा नदी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे तर प्रचंड नुकसान झालेले आहे. राजेगाव, दहिटना, बोरगाव, भोपला, हदगाव, डोका, लाखा, सुर्डी , सोनेसांगवी, नायगाव, इस्थळ या गावातील पिके पूर्णतः पाण्याखाली आहेत. अशा परिस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते रमेश आडसकर, आ. मुंदडा यांचे यजमान अक्षय मुंदडा, विष्णू घुले हे नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत.
दरम्यान केजचे तहसीलदार राकेश गिड्डे हे स्वतः अतिवृष्टी आणि नुकसानग्रस्त भागात चिखल तुडवीत आणि पाण्यातील काट्या कुट्याचा रस्त्याने शेतकऱ्यांच्या भेटीला जात आहेत.
दिनांक २३ सप्टेंबर रोजी मांगवडगाव येथील तेलेवस्ती वरील शेतकरी महादेव लक्ष्मण चादर हे शेतात जनावरे चारण्यासाठी गेले असताना अचानक पाणी वाढले आणि त्या पाण्यात त्यांची दोन म्हशी, गाय आणि वासरू अडकले होते. ही माहिती ग्राम महसूल अधिकारी यांनी तहसीलदार राकेश गिड्डे यांना दिल्या नंतर स्वतः तहसीलदार गिड्डे तेथे पोहोचले परंतु पाण्याचा प्रवाह जोरात वाहत असल्याने जनावरापर्यंत जाणे शक्य नव्हते. त्या नंतर दिनांक २४ सप्टेंबर रोजी पुन्हा तहसीलदार गिड्डे तेलेवस्तीवर पोहोचले मात्र यावेळी एक गाय वाचविण्यात यश आले मात्र दोन म्हशी आणि एक वासरू याचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी घटनास्थळी ऑन दी स्पॉट महादेव चादर यांना ९५ हजाराचा नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचा धनादेश त्यांना सुपुर्त केला.
_________________
डोळ्यात अश्रू आणि कंठ दाटला :- तेलेवस्ती वरील शेतकरी महादेव लक्ष्मण चादर यांचे दोन म्हशी व वासरू दगावला नंतर त्यांना मदतीचा धनादेश देत असताना डोळ्या देखत जनावरे मृत्युमुखी पडल्याने शेतकरी धाय मोकलून रडत असलेला बघून तहसीलदार देखील भावनिक झाले.
________________
बोरगाव येथे शेतकऱ्याने केली आत्महत्या :- उभे पीक पाण्यात घेण्यामुळे भावनाविवश झालेल्या बोरगाव येथील शेतकरी रमेश ज्ञानोबा गव्हाणे या ६२ वर्षाच्या शेतकऱ्याने विद्युत तारेला स्पर्श करून जीवन संपविले.
_________________
लाखा सोयाबीनची गंज वाहून गेली गावात पाणी :- लाखा येथील रघुनाथ माणिक रामिष्ठ या शेतकऱ्याने काढून ठेवलेल्या सोयाबीनची गंज डोळ्या देखत वाहून गेली. तर गावातील घरात पाणी शिरले आहे.
___________________
दहिटना कोंबड्या वाहून गेल्या :- दहिटना येथे विजयकुमार कातमांडे यांच्या पोल्ट्री शेडमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे शेडमधील २ ते ३ हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोनेसांगवी येथे म्हैस वाहून गेली :- सोनेसांगवी येथील शेतकऱ्याची देखील म्हैस वाहून गेली आहे.
______________
सुर्डी म्हैस मृत्युमुखी :- सुर्डी करण्यात येथील गणेश अंकुशे या शेतकऱ्याची म्हैस पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली.
__________________
नायगाव म्हैस दगावली :- इस्थळ पासून जवळ असलेल्या नायगाव येथील महिला शेतकरी वर्षा सुरेश खोडसे यांची उंदरी नदीत म्हैस वाहून गेली.