आत्मनिर्भर भारतासाठी जल व्यवस्थापन काळाची गरज – डॉ.हनुमंत सौदागर
केज –
वर्तमान काळात पाणी, नाणी आणि वाणी याचा अत्यंत जपून वापर करणे आवश्यक आहे. कारण या तिन्हीच्याही अतिरिक्त वापरामुळे अनेक समस्या गंभीर निर्माण झाल्या असून भारताला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी जल व्यवस्थापन करणे ही काळाची गरज व भविष्याची मागणी असण्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालय व भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय, केज यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल विभागाच्या वतीने आयोजित 22 मार्च जागतिक जल दिनानिमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. किरणकुमार धिंमधिमे हे होते. यावेळी प्रा. राजश्री कचरे व प्रा. उषा बलाढ्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष समारोप प्रसंगी बोलताना डॉ. धिंमधिमे म्हणाले की, पाणी ही अत्यंत ज्वलंत समस्या असून सामाजिक स्वास्थ्यासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी लोक चळवळीच्या माध्यमातून जल व्यवस्थापनाचे काम करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाची सांगता जल प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अर्चना वाघमारे यांनी प्रास्ताविक डॉ. नागेश कराळे तर आभार विद्यार्थी अविनाश मुंडे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
