बजरंग सोनवणे ‘प्रारब्धा’चे धनी..!
-इंजि. सुरज लक्ष्मण खोडसे

———————————-
बजरंग सोनवणे…हे नाव ६ जुलै १९७० साली सामान्य घरात जन्माला आले. वडील हाडाचे शेतकरी. यामुळे कष्टाशी आणि शेतीशी जवळून संबध आलेला. पण शेतीसोबत समाजकारण, राजकारणही हवे असा विचार मनात घोळू लागला. यातूनच बजरंग बप्पांनी राजकारणात यायचा निर्णय घेतला. आपले ‘प्रारब्ध’ आपणच ठरवू, असे म्हणत हा शेतकरी पुत्र अवघ्या पंचविसाव्या वर्षी गावच्या राजकारणात उतरला. पहिल्याच निवडणूकीत त्यांना विजयाचा टिळा लागला आणि तिथून पुढे त्यांनी राजकारणात कायम चढत्या क्रमाने मार्गक्रमन केले. उपसरपंच ते खासदार ही वाटचाल थक्क करणारी आहे…
– [ ] बजरंग सोनवणे पहिल्यांदा गावच्या राजकारणात आले. पहिल्याच प्रयत्नात ते उपसरपंचही झाले. यानंतर त्यांच्यावर शरदचंद्र पवार यांच्या विचाराचा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली. सन २००७ मध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढवली. यात त्यांना गुलाल लागला. यापढे त्यांचे आणि गुलालाचे नाते अजूनच घट्ट झाले. २०१२ ला पुन्हा एकदा युसुफवडगावमधून जिल्हा परिषद सदस्य झाले. जिल्हा परिषद सदस्यत्वाची हॅट्रिक करत चिंचोलीमाळीमधून २०१७ ला सलग तिसऱ्यांदा निवडून आले. इकडे लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडताना राष्ट्रवादीने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. यानंतर केजपर्यंत मर्यादित असलेले बजरंग सोनवणे जिल्ह्यात पोहचले. पदावर असताना त्यांनी जिल्हाभर संपर्क वाढविला. हक्काची माणसे उभा केली आणि त्यांना ‘आपला माणूस’ हा विश्वासही दिला. राजकारण करताना आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात अच्छे दिन यावेत, यासाठी साखर कारखाना उभा करण्याचे धाडस केले. जिथे भल्याभल्यांना कारखाने चालविणे शक्य झाले नाही, अशा दुष्काळी जिल्ह्यात कारखाना उभारणीचे काम हाती घेतले. अवघ्या ९ महिन्यात त्यांनी कारखाना उभारला आणि शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांच्या हाताला काम देऊन हजारो चुली पेटविण्याचे काम केले. बीड जिल्ह्यात ७० टक्के क्षेत्रावर कापूस लागवड होत होती, मात्र, सोनवणे यांनी यडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राच्या तोडीस तोड ऊसाला भाव दिल्याने कापूस उत्पादक शेतकरी ऊसाकडे वळले. पुर्वी गोड ऊसाची कडू कहानी या भागात होती, तिच कहानी गोड करून दाखविण्याचे काम सोनवणेंनी करून दाखविले. बीड जिल्ह्यात सर्वाधिक उसाला भाव देण्याचा विक्रमही बप्पांच्या नावे आहे. अजून तरी ऊस दराच्या बाबतीत बरोबरी करू शकलेले नाही. याच कारणाने त्यांना शेतकरी पुत्र ही बिरूदावली शेतकऱ्यांनीच लावली. याच कारखान्यात अत्याधुनिक आणि स्वयंचलित असणारा इथेनॉल निर्मितीचा पहिला प्रकल्प देखील बप्पांच्याच पुढाकाराने उभारला. सामाजिक क्षेत्रामध्ये येडेश्वरी फौंडेशन मार्फत बजरंग बप्पा सोनावणे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात. सन २०१९ साली बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक लढवविण्याची जबाबदारी स्वत: शरदचंद्र पवार यांनी बप्पावर टाकली होती. त्यांनी या निवडणूकीत ५,०९,८०७ (पाच लाख नऊ हजार आठशे सात) मते घेतली, पण पराभव पत्कारावा लागला. हा पराभव जनतेने केला आहे आणि तो हसत हसत स्विकारला पाहिजे, एका पराभवातून खचून न जाता किंवा कसलीही चिडचिड न करता पुन्हा ते कामाला लागले. जिल्हाभर आपले नेटवर्क तयार करणे सुरूच ठेवले. परंतु हे करताना पक्षातील लोकांच्या डोळ्यात हे येणार नाही, याची काळजी घेतली. दरम्यान, त्यांच्याकडे जिल्हा परिषदेत शिक्षण सभापतीपद आले. या माध्यमातून गरिबांची लेकरं शिकली पाहिजेत, त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रमाणिक प्रयत्न सुरू केले. यातून’माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान पुढे आले. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व शाळा डिजीटल करून त्यांचा कायापालट आणि खऱ्या अर्थाने उध्दारच केला. त्यांच्याच पुढाकाराने ज़िल्हा परिषद शाळांसाठी तयार केलेले माझी शाळा हे अँप विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरलेच पण याची राज्याने दखल घेतली. कोविडच्या काळात प्रत्येक जण घराचे दार लावून बसलेला असताना बजरंग बप्पांनी याच जिल्ह्यातील लोकांचे जिव वाचावेत, यासाठी जिवाचे रान केले आणि येडेश्वरी कारखान्यातील इतर उत्पादन थांबवून सॅनेटायझरचे उत्पादन सुरू केले. त्यातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला. शिवाय बीड बरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर सॅनेटायझरचे वाटपही केले. दरम्यान, मध्यल्या काळात त्यांना घेरण्यासाठी पक्षातील घराणेशाहींनी सुरूवात केली. त्यांची करता येईल तितकी आडवणूकही करण्यात आली. यामुळे काही काळ ते राजकारणापासून अलिप्त दिसत परंतु तसे नव्हते. या काळात बप्पांनी गावागावात हक्काची माणसे जोडली. राजकारणा पलिकडे जाऊन लोकांचे सुख दूख जाणून घेतले. दरम्यान, लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागल्यानंतर बजरंग बप्पावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले. तुम्ही निवडणूक लढाच अशी मागणी होऊ लागली. परंतु यावेळी बप्पा अजित पवार गटात होते आणि आपण पुन्हा शरदचंद्र पवार यांच्यासोबत पडत्या काळात जाऊन लढले पाहिजे, असा निर्णय त्यांनी घेतला. निर्णय घेताच जिल्ह्यातील काही नेत्यांनी प्रारब्धाच्या गोष्टी रंगविण्यास सुरूवात केली. मात्र, बजरंग सोनवणे हे प्रारब्धाचे धनी आहेत याचा विसरही त्यांना पडला होता. निवडणूकीला सुरूवात झाली. बजरंग सोनवणेंची औकात काढण्यात आली. लायकीपर्यंत विरोधक घसरले मात्र, इतक्याही काळात समोर शेकडो पुढाऱ्यांची फौज असताना बजरंग सोनवणे हे सामन्य कार्यकर्त्यांना सोबत घेवून लढले. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला भिडले आणि हरेक आरोपांनाही तोडलेही. समोर बलाढ्य ताकद, अफाट धन आणि हाती असलेल्या सत्तेचा गैरवापर होत असताना बप्पांनी धिर सोडला नाही. गावागावात गेले. रात्रीचा दिवस केला आणि भेटलेल्या प्रत्येक माणसाला आपलेसे केले. यातूनच दि.४ जून रोजी त्यांच्यावर गुलाल पडला. याच गुलालात त्यांनी आपली औकात दाखवून देत दिल्ली गाठली. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या तोंडून एकच वाक्य आले “याचसाठी केला होता अट्टाहास”. मतदान झाल्यानंतर ४ दिवसांनी बप्पा व सारिकाताईंचा फोन आला, “बाळा, खूप कष्ट घेतलेस” या एका वाक्याने निवडणूकीत घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. निकालानंतर खासदारांसोबत सर्वप्रथम दिल्लीवारी घडली त्याचेही अप्रुप व अभिमान माझ्यासारख्याला आहेच. पक्षप्रवेशाला आडकाठी, तिकीट मिळेपर्यंत धाकधूक, अर्ज भरायला मोठा नेता नाही, मतदानात “पिपाणी” चिन्ह, निकाल लागल्यानंतरही २ तास प्रमाणपत्र मिळाले नाही. आयुष्यभराची मेहनत पणाला लावली होती पण योद्ध्याने संघर्ष केला, विजयी झाला. आज या लढवय्या शेतकरी पुत्राचा वाढदिवस, त्या निमीत्ताने त्यांना मनपुर्वक शुभेच्छा…
-इंजि. सुरज लक्ष्मण खोडसे
9765259393
