केजच्या विविध मागण्यांसाठी केज विकास संघर्ष समितीचा एक तास रस्ता रोको आंदोलन.
केज: शहरातील विविध प्रलंबित प्रश्नावर केज विकास संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली केज-अंबेजोगाई महामार्गाच्या केजडी नदी पुलावर एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
केज शहरातील खामगांव-पंढरपूर व अहमदपूर-अहमदनगर महामार्गावरील पथदिवे गेली दोन वर्षांपासून रस्ता कामाच्या नावाखाली दोन वर्षांपासून बंद आहेत. सध्या शहरात गणेशोत्सव व त्यानंतर नवरात्र उत्सव साजरा होणार असून यावेळी शहरातील महिला, मुले, वृद्ध व इतर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात अशावेळी या महामार्गावरील पथदिवे तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे असे समितीने म्हटले आहे.
या महामार्गावर रात्रभर वाहतूक सुरू असते तसेच पहाटे चार वाजल्यासपासून अनेक लोक सकाळी फिरायला या रस्त्यावर येतात. मात्र रस्त्यावर पथदिवे नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. आता किमान गणेश विसर्जनापूर्वी महामार्गावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी समितीने केली आहे.
याशिवाय पहील्या टप्प्यात उमरी रस्त्याचे नव्याने बांधकाम झाले मात्र अद्याप रस्त्याच्या एका बाजूने आवश्यक पंखा भरून घेतलेला नाही. तसेच एका बाजूने नाली काम केले आहे मात्र ती नाली पुढे पूर्ण करण्यात आलेली नाही. नालीमध्ये पडलेले बांधकामाचे अवशेष व दगड -माती साफ केलेली नाही. या रस्त्याचा मुख्य रस्त्याला जोडलेला भाग मातीचे ढीग व अतिक्रमण मुक्त करून रस्ता सुरक्षित करणे गरजेचे आहे. याशिवाय शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृह आणि केज बसडेपो मंजुरी सतत पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी व प्रशासन मूग गिळून गप्प बसत आहेत. केवळ जल्लोषात उदघाटने करून नंतर कामे केली जात नाहीत याकडेही प्रशासनाचे लक्ष समितीने वेधले आहे. संबंधित यंत्रणेने वरील मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूनी दूरवर रांगा लागल्याचे दिसून आले. पीएसआय राजेश पाटील यांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात समीतीचे नासेर मुंडे, शेषराव घोरपडे यांच्यासह केजचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
