जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;
विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणे गरजेचे आहे- प्रा. डॉ. शांतिनाथ बनसोडे
शिक्षण, आरोग्य व शिस्त ही नाळवंडीकर गुरुजींची त्रिसूत्रे होती – जी. बी. गदळे
सोनवणे आश्रुबा, शिनगारे सुरेश, पाळवदे बाबुराव, मोटे दिपा, राऊत सुनिल हे ठरले आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी.
केज प्रतिनिधी: दि. ६ सप्टेंबर- आजच्या आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात मानवी मूल्ये मागे पडत चालली आहेत. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, दयाळूपणा, आदर, कृतज्ञता आणि सहानुभूती यांसारख्या मूल्यांचे धडे देणे आवश्यक आहे, जेणेकरून ते समाजात वावरताना जबाबदारीने वागतील. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. केवळ पुस्तकी ज्ञान किंवा तांत्रिक कौशल्ये मिळवून माणूस हुशार बनू शकतो, पण एक चांगला आणि संवेदनशील माणूस बनण्यासाठी संस्कारांची अत्यंत आवश्यकता असते. केवळ गुणांच्या मागे धावल्यामुळे आणि नैतिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आजकाल तरुण पिढीमध्ये असंवेदनशीलता वाढताना दिसत आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांमधील संस्कारांच्या कमतरतेमुळे ते चुकीच्या मार्गाला किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची शक्यता असते. संस्कारक्षम शिक्षण अशा प्रवृत्तींना आळा घालण्याचे काम करते. असे प्रतिपादन अंबाजोगाई येथील प्रा. डॉ. शांतिनाथ बनसोडे यांनी केले.
केज येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [ माध्यमिक विभाग ] या शाळेमध्ये दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत हर्षोत्सात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जी. बी. गदळे सचिव, जीवन विकास शिक्षण मंडळ केज हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. शांतिनाथ बनसोडे से. नि. विभाग प्रमुख ( वाणिज्य ) यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई. यांनी उपस्थिती दर्शविली. इतर उपस्थित मान्यवरांमध्ये अंकुशरावजी इंगळे अध्यक्ष, जीवन विकास शिक्षण मंडळ तथा सभापती, कृ.उ.बा. समिती केज. नारायण अंधारे अध्यक्ष, शा.व्य.स. स्वयंअर्थ शाळा, इंजि. दिनकरराव नाळवंडीकर, विजयकुमार शिनगारे, शिवाजीराव समुद्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, प्राचार्य शंकर भैरट, स्वयंअर्थ शाळेचे मु.अ. अविनाश कराड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत ‘शब्ध सुमने अंत करणे अतिथीनां वंदूनी करितो स्वागत मंगल दिनी’ या स्वागतगीताने शाळेतील सहशिक्षक प्रबोधकांत समुद्रे तसेच शाळेतील विद्यार्थिनी यांनी केले. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिक्षण क्षेत्रातील कर्तुत्वान शिक्षकांना स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये, सोनवणे आश्रुबा अर्जुनराव मु.अ. (से.नि.) जि.प.कें.प्रा.शा. केज, शिनगारे सुरेश भैरुनाथ स.शि.श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस, पाळवदे बाबुराव लिंबाजी स.शि.जि.प.प्रा.शा. सारुळ (बरडफाटा), मोटे दिपा चंद्रकांत जि.प.प्रा.शा.सारणी (आ.), राऊत सुनिल रावसाहेब बाबुरावजी आडसकर महा. केज इत्यादी.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय शाळेतील सहशिक्षक अजय देशपांडे यांनी दिला. ते म्हणाले, शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा आलेख नेहमी उंचावत राहावा यास्तव त्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य संस्था दरवर्षी करत असते, नाळवंडीकर गुरुजींनी गरजूवंत व होतकरू विद्यार्थ्यांना स्वतः घरी जाऊन मार्गदर्शन केले, त्यांचे कार्य हे अलौकिक होते, तेव्हा त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून त्यांच्या नावे हा पुरस्कार दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिला जातो.
याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना सोनवणे आश्रुबा म्हणाले, नाळवंडीकर गुरुजी यांची राहणीमान अत्यंत साधी होती, त्यांच्याकडे माणसांना जोडण्याची कला होती. समाजाच्या खऱ्या समस्या ते सोडविण्याचा प्रयत्न करत असत, तेंव्हा समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना प्रत्येकाची असली पाहिजे.
याप्रसंगी बोलताना सुरेश शिनगारे म्हणाले, ही शाळा आदर्श शिक्षक पुरस्कार देणारी नव्हे तर खरोखरच बीड जिल्ह्यातील एक आदर्श शाळा आहे. शिक्षक हा अध्यापनापुरताच मर्यादित नसतो तर तो सामाजिक बांधिलकी जपणारा असावा. निर्व्यसनी शिक्षकच समाजाला निर्व्यसनी राहण्याचे थोडे देऊ शकतो.
श्रीमती मोटे मॅडम याप्रसंगी बोलताना म्हणाल्या, स्वामी विवेकानंदाप्रमाणेच ही शाळा देखील आदर्श आहे, विवेक हा प्रत्येकामध्ये असला पाहिजे कारण आत्मिक सुंदरता ही अधिक महत्त्वाची असते. सध्याच्या काळामध्ये विद्यार्थी व पालकांनी हे जाणले पाहिजे मोबाईल हे साधन आहे ते साध्य नाही.
अध्यक्षीय समारोपात जी. बी. गदळे म्हणाले, स्व. नाळवंडीकर
गुरुजी व विश्वंभरराव कोकिळ हे या संस्थेचे खरे आधारस्तंभ होते. नाळवंडीकर गुरुजी यांनी जीवनामध्ये शिक्षण, आरोग्य व शिस्त या तीन गोष्टींना अधिक महत्त्व दिले. तसेच नवयुवकांना व्यायामाचे फायदे व व्यसनाचे परिणाम यांचे धडे ही ते देत असत. म्हणूनच त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे भाग्य ही आम्हाला लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले. तर आभार सहशिक्षक दत्ता सत्वधर यांनी मानले.