स्व. संतोष देशमुख यांची लेक वैभवीने बारावीच्या परिक्षेत मिळवले घवघवीत यश !
गौतम बचुटे/केज –
मस्साजोगमध्ये वडिलांची दिवसा ढवळ्या झालेली हत्या.
संतोष देशमुख यांच्या न्यायासाठीचा लढा आणि वडिलांच्या हत्ये नंतर घरातील प्रचंड तणावाच्या वातावरणात डोळ्यात पाणी, ह्रदयात आभाळा एवढे दुःख अशा मानसिकतेतून जात वैभवी देशमुख हिने १२ वी. ची परीक्षा दिली होती.
परीक्षा देण्याची मानसिकता नसली तरी कुठेतरी मन एका जागेवर आणून वडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन अगदी घट्ट करून वैभवी देशमुख हिने बारावी बोर्डाची परीक्षा दिली. आणि आज त्या परीक्षेचा निकाल लागला. वैभवी देशमुख हिने विशेष प्राविण्यासह ८५.३३% गुण प्राप्त केले आहेत.
दिवंगत संतोष देशमुख यांना दोन मुले असून कु. वैभवी देशमुख ही इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकत होती. तर लहान विराज देशमुख हा इयत्ता पाचवी मध्ये लातूर येथे शिकत आहे. वैभवी ही लातूर येथे क्लास करीत होती.
वडिलांचे छत्र हरवले त्याचे दुःख आणि त्या नंतर महाराष्ट्रात निघालेले मोर्चे यामुळे दोन महिन्यापासून वैभवीला क्लासला उपस्थित राहता आलेले नव्हते किंवा मन लागत नसल्याने तिला अभ्यास देखील करता आलेला नव्हता.
त्यातच दि. ११ फेब्रुवारी पासून महाराष्ट्र उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या. घरातील सर्व दुःख म्हणजे मुलांसाठी वडील हे सर्वात मोठा आधार आणि बळ असते त्या वडिलांचा झालेली निर्घृण हत्या हे सर्व प्रसंग दिवस रात्र डोळ्या समोर असताना वैभवीने धीराने परीक्षा दिली.
आज ऑनलाईन निकाल असल्याने वैभवीने सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करत असल्याचे म्हटले. त्यांच्या आशीर्वादाने निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास होता असं तिने म्हटले होते.
त्या परीक्षेचा आज दि. ५ मे रोजी निकाल लागला असून वैभवी देशुख हिने ८५.३३%गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.
———————————
मानसिकता नसताना मन घट्ट करून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली होती परीक्षा :-
ज्या वेळी परीक्षा सुरू झाली. त्यावेळी माध्यमां समोर आपल्या भावना व्यक्त करताना वैभवी देशमुख म्हणाली होती की, पहिलाच पेपर होता. ज्या वेळेस माझे वडील तिच्या सोबत नव्हते. परीक्षेचे तीन तास म्हणजे खूप कठीण होते. आधी तर मानसिकताच नव्हती. पेपर सोडवत असताना तिला प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते होती. पेपरला जाण्या अगोदर मनात खूप खळबळ निर्माण झाली होती. पण नंतर तिने ठरवलं की, नाही; पेपर द्यायलाच हवा. वडिलांचे जे स्वप्न होते. ते मला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी परीक्षा देण्याची मानसिकता नसली तरी तिने मन एका एकाग्र करून वडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन अगदी घट्ट करून परीक्षा दिली होती.
__________________
“आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली आहे.
—– वैभवी देशमुख
