निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत
केज, प्रतिनिधी :
शिवसेनेचे संसदीय गटनेते व खासदार श्रीकांत शिंदे हे ‘शिवसंवाद दौऱ्या’निमित्त बीड जिल्ह्यातील केज येथे आले असताना एक दुःखद घटना घडली. केज येथील रसूल गफुर सय्यद उर्फ रसूल बाबा (वय ६५) यांचे बैठकीच्या ठिकाणी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
रसूल बाबा हे व्यवसायाने भाजी विक्रेते होते. मुलाच्या अपघाती निधनानंतर कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी ते निवेदन देण्यासाठी कार्यक्रमस्थळी आले होते. याचदरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थितांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तत्काळ रसूल बाबा यांच्या केज येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दुःख व्यक्त करत कुटुंबीयांचे सांत्वन केले व या कठीण प्रसंगी शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास दिला.
रसूल बाबा यांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला. त्यांच्या अकस्मात निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पक्षातर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून सुपूर्द केली.
या मदतीमुळे दुःखात असलेल्या रसूल बाबा यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संवेदनशीलतेचे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.