मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान; खा. रजनीताई पाटील यांच्या मागणीला यश !
———————–
केज दि.४(प्रतिनिधी) देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तमिळ भाषेला सर्वात आधी २००४ साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला. त्यापाठोपाठ संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते. त्याच प्रमाणे केंद्र सरकारने आता मराठी भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे यासाठी अनेक वेळा राज्यसभेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा. सौ. रजनीताई पाटील यांनी आवाज उठवला होता व या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने अखेर ही मागणी पूर्ण केली त्याबद्दल केंद्र सरकार व खा. रजनीताई पाटील यांचे आभार व्यक्त होत आहेत.
अभिजात दर्जा मिळाल्याने कोणते फायदे मिळणार? अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना केली जाते. प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं. भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार. भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळण्याचे निकष काय?
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असायला हवी. त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी. ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावे, अनुवादित नसावे. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे, अशा सर्वसाधारण अटी आहेत. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते. त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो. मराठी भाषेने हे सर्व निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे हा निर्णय होत असताना खा. रजनीताई पाटील यांनी केलेली मागणी योग्य व मराठी भाषिकांचा सन्मान करणारी होती हे विशेष.
सोबत खा. रजनीताई पाटील यांच्या भाषणाचा video व ताईंचा फोटो
