केज-मांजरसुंबा रोडवर पेट्रोल पंपाजवळ वाटमारी
राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परला अडवून ड्रायव्हर मारहाण करून रोख रक्कम, आणि डिझेलसह स्टेपनी पळविली
गौतम बचुटे/केज :- उसाचे ट्रॅक्टर समोरून येत असताना वाहनाचा वेग कमी होताच अंधारात रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या सहा अनोळखी इंसमानी ड्रायव्हरला खाली ओढून बेदम मारहाण करून ड्रायव्हरसह टिप्पर पळून नेऊन ड्रायव्हर जवळील पैसे आणि टाकीतील डिझेलसह स्टेपनी चोरून नेत वाटमारी केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि.२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री लक्ष्मण राजाराम आंधळे हे राखेचे टिप्पर क्र. (एम एच-४४/ यु-०७४४) हे एकटेच परळीकडून मांजरसुंबाकडे घेऊन जात असताना रात्री १:३० वा च्या सुमारास सारणी (सांगवी) जवळ असलेल्या जोला येथील रेणू पेट्रोल पंपाजवळ ते उसाच्या ट्रॅक्टर समोरून येत असल्याने त्यांनी आपल्या वाहनाचा केज कमी करताच अंधारात रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात दबा धरून बसलेल्या सहा अनोळखी इंसमानी त्यांना खाली ओढून लाकडी काठ्यानी बेदम मारहाण केली. मारहाण केल्या नंतर त्या पैकी एकाने ते टिप्पर स्वतः चालवीत आडवाटेने पळवून नेले. त्या नंतर पुन्हा लक्ष्मण आंधळे यांना शेतात नेऊन मारहाण केली. त्यांच्या जवळ ३ हजार ४०० रु काढून घेतले आणि टिप्पर मधील डिझेल काढून घेतले. तसेच स्टेपनीचे टायरही काढून घेतले.
मारहाण करीत असताना ते अनोळखी इसम त्याला हिंदीत बोल असे म्हणत होते. मारहानी नंतर लक्ष्मण आंधळे याला त्यांनी सोडून देत टिप्पर स्वाधीन केले आणि ते अनोळखी चोरटे पळून गेले.
या वाटमारीमुळे चालकवर्गात दहशत निर्माण झाली आहे.
