पंकज कुमावत यांच्या पथकाने ५ लाख ६६ रु चा गुटखा पकडला !
केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या विशेष पथकाने नेकनूर येथे कारवाई करून ५ लाख ६६ हजार रु. चा गुटखा ताब्यात घेऊन तिघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २४ सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फ़त माहिती मिळाली की, नेकनूर गावात रामेश्वर खिंडकर नावाचा इसम हा महाराष्ट्र शासनाने विक्री, साठा व वाहतूकीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा विनापरवाना अवैधरित्या साठा करून चोरटी विक्री करीत आहे. अशी खात्रीपूर्वक माहिती मिळताच त्यांचे पथकातील पोलीस हवालदार डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंदे महिला अंमलदार आशा चौरे, गृह रक्षक दलाचे जवान गदळे व ठोंबरे यांच्या पथकाने सदरील ठिकाणी छापा मारला. त्यावेळी तेथे रामेश्वर खिंडकर नावाचा व्यक्ती मिळून आला. त्याच्या घराचे समोर असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये
विविध कंपनीचा पान मसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू व जर्दा असा एकूण ५ लाख ६६ हजार ६६६ रु. चा मुद्देमाल पंचा समक्ष ताब्यात घेतला.
या प्रकरणी पोलीस अंमलदार दिलीप गित्ते यांचे फिर्यादी वरून रामेश्वर खिंडकर (रा.नेकनूर), सतीश जाधव (रा. चौसाळा) आणि आबा मुळे (रा. बीड) या तिघांच्या विरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
