मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण;
केज शहरातील घटना
गौतम बचुटे/केज :-
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची घटना केज शहरात घडली आहे.
सदरील मुलगी ही केज येथे तिच्या आईसोबत राहात आहे. ती शहरातील एका विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी सदरील मुलगी ही नित्य नियमा प्रमाणे सकाळी ६:०० वा. च्या सुमारास बीड रोडने मॉर्निंग वॉकला गेली होती. सकाळी ८:०० वाजून गेल्या नंतर ती घरी परत आली नाही म्हणून तिच्या घरच्या नातेवाईकांनी केज शहरात आणि इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तसेच तिचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे दि. २ सप्टेंबर रोजी तिची आई हिच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्या प्रकरणी गु. र. नं. ५२१/२०२३ भा. दं. वि. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.