जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेचा स्तुत्य उपक्रम !
शहराची सागसफाई करून स्वच्छता ठेवणाऱ्या महिलांना साडी चोळी केले वाटप
गौतम बचुटे/केज :- जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करीत असलेल्या एका शिक्षिकेने शहरात साफसफाई आणि स्वच्छतेचे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे स्वच्छता राखली जात आहे. त्यांच्या परिश्रमामुळे आणि मेहनतीमुळे शहराचे आरोग्य व्यवस्थित राखले जाते. म्हणून सौ आशा पुरंदरे-मुळी या शिक्षिकेने अधिक मास आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सफाई कामगार भगिनींना साडी चोळी देऊन त्यांचा गौरव केला. या उपक्रमा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केज तालुक्यातील साळेगांव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ येथील शाळेत सौ आशा पुरंदरे-मुळी या सहशिक्षका म्हणून कार्यरत आहेत. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना विद्यादानाचे व ज्ञानार्जनाचे कार्य उत्तम प्रकारे निभावत आहेत. त्या त्यांच्या कुटुंबासह लगतच्या कळंब शहरात राहतात. त्यांना जाणवले की, शहराची साफसफाई आणि स्वच्छता ही सफाई कामगारामुळे राखली जाते. त्यामुळेच शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखले जाते अशा या सफाई कामगार महिला भगिनींच्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे आणि त्यांच्या या कामाची प्रतिष्ठा राखली जायला हवी म्हणून त्यांनी स्वातंत्र्य दिन आणि अधिक मासाचे औचित्य साधून सफाई कामगार भगिनींना साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार केला या अनोख्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमिला बिदादा तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सौ. सुरेखा राजेश पारेख उपस्थित होत्या. या कार्यक्रमा मागची भूमिका विशद करताना सौ. आशा पुरंदरे- मुळी यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या कार्याची ओळख करून दिली आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साळेगांव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका सुरेखा ठोंबरे-काळे यांनी केले.
आशा पुरंदरे-मुळी यांच्या या अनोख्या धोंडे जेवणाच्या व स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक व चर्चा सुरू आहे.
