वाटमारी प्रकरणातील सराईत आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुसक्या
गौतम बचुटे/केज :- वाटमारी सारख्या गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपीच्या बीड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका गुन्हेगाराला केज परिसरातून ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळ्यात यश मिळविले आहे.
महामार्गावर रात्रीच्या वेळी रस्त्यावर अडथळे टाकून किंवा आमिष दाखवून वाहने अडवून चालक व प्रवाशांना मारहाण करून वाटमारी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात वाटमारी आणि चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला एक गुन्हेगार हा केज परिसरातील बोबडेवाडी परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार मारोती कांबळे
पोलीस हवालदार जायभाये,
पोलीस नाईक राजू पठाण, अर्जुन यादव, पोलीस अमलदार विकी सुरवसे यांनी दि. ६ मार्च रोजी केज तालुक्यातील बोबडेवाडी येथुन सराईत गुन्हेगार शिवा दादा शिंदे वय २३ वर्ष रा. नांदूरघाट ता. केज याला ताब्यात घेतले. त्याच्यावर केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १६१/ २०२२ भा. दं. वि. ३९५ आणि गु. र. नं. १८८/२०२२ भा. दं. वि. ३९४ व ३४ तसेच नेकनूर पोलीस ठाण्यात गु. र. नं. १४८/२०२१ भा. दं. वि. ३९५ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवा शिंदे हा सराईत आणि अत्यंत चलाख गुन्हेगार असून त्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. या बद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व स्तरातून आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यां कडून कौतुक होत आहे. शिवा शिंदे याच्या कडून आणखी काही गुन्ह्याचा तपास लागण्याची शक्यता आहे.
