नाव राष्ट्रीय महामार्ग मात्र पुलाचा दर्जा सुमार !
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची बनवाबनवी ……!
जिथं माहिती अधिकारी कार्यालयाला बनविले तिथं सामान्यांचं काय !

उघड्या पडलेल्या सळया आणि खड्ड्यामुळे जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण ?
उखडलेले पूल अद्यापही धोकादायक !
पुलावरच्या जम्पिंगमुळे होत आहेत अपघात
गौतम बचुटे/केज :- राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाच्या लोखंडी सळया सताड उघडल्या पडलेल्या असून त्या धावत्या वाहनांच्या टायरमध्ये घुसून भीषण अपघात होण्याची भीती असताना देखील महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने नुसत्या पत्रा-पत्रीच्या खेळात माहिती कार्यालय आणि माध्यमांची बनवा बनवी केली असल्याचे दिसून येते
या बाबतची माहिती अशी की, केज ते कुसळंब दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-सी साखळी क्र. १६४ + ०५३ (मायनर ब्रिज) या साळेगांव ता केज येथील पुलाचा ॲप्रोच स्लॅब दबला असल्याने पुलातील विअरिंग कोटचे लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. या बाबत दि. २२ ऑगस्ट २०२२ च्या दै पुढारीच्या अंकात राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाला गेले तडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते त्याची दखल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांनी घेत दि. २६ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा माहिती अधिकारी बीड यांना दै पुढारी च्या वृत्ताचा संदर्भ देऊन कंत्राटदार व प्राधिकरणाचे सल्लागार यांच्या कडून अहवाल मागविला असता कंत्राटदाराने स्वखर्चातून त्वरीत नव्याने ॲप्रोच स्लॅब चे काम करुन देण्याचे संदर्भीय पत्र क्र. ३ अन्वये कळविले आहे. त्या अनुषंगाने साखळी क्र १६४ + ०५३ ( मायनर ब्रिज ) चे काम त्वरीत हाती घेण्यात येत आहे असे कळवून त्याची प्रत महितीसत्व अधीक्षक अभियंता, औरंगाबाद यांना आणि कार्यवाहिस्तव, जालना याना दिले होते.
या घटनेला चार महिने उलटून गेले आहेत. आता पूर्वी पेक्षाही जास्त खड्डे पडलेले आहेत. वृत्त प्रकाशित होताच अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रा नुसार दुरुस्तीची कारवाई झालेली नाही. म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा माहिती कार्यालयाची फसवणूक करण्याचा प्रकार आहे.
