क्रांतीज्योती साविञीबाई फुले जयंतीनिमित्त
आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा संपन्न ;
आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी ठरल्या वंदना दगडु गुट्टे (ठोंबरे), लता व्यंकटराव बांगर (मुंडे) , आशा किसनराव मुळी (पुरंदरे) , सविता धोंडिबा बोठे (देशपांडे), अनिता दत्तात्रय मोरे (तपसे), सुरेखा साहेबराव लोंढे (बचुटे), प्रिती धनराज राजगुरु (अंधारे), योजना कल्याणराव सातव (मोहिते) , प्रियंका उध्दवराव मुळीक (यादव), पल्लवी मधुकर बिडवे (राऊत)
केज प्रतिनिधी
प्राचीन काळी भारतीय समाजामध्ये स्ञियांना दुय्यम स्थान होते. स्ञीच जीवन चुल ते मुल या उक्तीप्रमाणे सिमित होते. शिवाय सती प्रथा, बालविवाह, हुंडापध्दती, पडदा पध्दती, केशवपन, अशा अनिष्ट प्रथांमुळे त्यांचे जीवन अत्यंत हलाकीचे होते. त्या परिस्थितीतही समाजाचा प्रचंड रोष पत्करुन महिलांना शिक्षणाची जाणीव करुन देण्याचे काम क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांनी केले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले तसेच समाजातील या कुप्रथा उखडून टाकल्या. सध्याच्या मुलींनी नैतिकतेने वागले पाहिजे व जास्तीत जास्त ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत असे प्रतिपादन प्रा. डॉ. द्वारका गिते यांनी केले.
केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर मा. वि. या शाळेमध्ये क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठवाडा साहित्य परिषद शाखा केज तसेच जीवन विकास शिक्षण मंडळ केज यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या तसेच व्यक्तिगत जीवनातही सामाजिक नैतिकतेने जीवन जगणाऱ्या उपक्रमशिल शिक्षिकांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तेंव्हा याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ. शैलाताई संदिप इंगळे, अध्यक्षा- शालेय व्यवस्थापन समिती स्वा. वि. वि. मंदिर मा. वि. केज. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. द्वारका सुदाम गिते (मुंडे) कला महाविद्यालय, नांदुरघाट या उपस्थित होत्या. तसेच याप्रसंगी जीवन विकास शिक्षण मंडळाचे सचिव जी. बी. गदळे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष राहुल गदळे, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नवनाथ काशिद, जीवन विकास शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष फजिलोद्दीन काजी, शाळेचे मा. वि. चे मु.अ. बी. व्ही. गोपाळघरे, प्रा. वि. चे मु.अ. वसंत शितोळे, प्राचार्य शंकर भैरट आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव जी. बी. गदळे सर यांनी दिला. उपस्थित मान्यवरांचे स्वागात शाळेतील सहशिक्षक प्रबोधकांत समुद्रे त्यांचे वडील शिवाजी समुद्रे व शाळेतील विद्यार्थीनी यांनी ‘परंपरागत वंदनीय अभ्यागतम सुस्वागतम’ या स्वागत गीताने केले.
आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी ठरल्या वंदना दगडु गुट्टे (ठोंबरे) जि. प. प्रा. शाळा. जिवाचीवाडी, लता व्यंकटराव बांगर (मुंडे) जि. प. प्रा. शाळा उमरी, आशा किसनराव मुळी (पुरंदरे) जि. प. प्रा. शाळा सातेफळ, सविता धोंडिबा बोठे (देशपांडे) जि. प. मा. शाळा नाव्होली, अनिता दत्तात्रय मोरे (तपसे) जयभवानी कन्या प्रशाला केज, सुरेखा साहेबराव लोंढे (बचुटे) जि. प. प्रा. शाळा नागझरी, प्रिती धनराज राजगुरु (अंधारे) जि. प. प्रा. शाळा सारणी ( आनंदगाव ), योजना कल्याणराव सातव (मोहिते) जि. प. कें. प्रा. शाळा चिंचोली ( माळी ), प्रियंका उध्दवराव मुळीक (यादव) जि. प. प्रा. शाळा कापरेवाडी, पल्लवी मधुकर बिडवे (राऊत) स्वामी विवेकानंद विद्या मंदिर ( मा. वि. ) केज.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रांजली भारत जाधव हिने कोव्हीड दरम्यान शाळा बंद असताना गावातील विद्यार्थ्यांची शिकवणी घेतल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात आदर्श शिक्षिका प्रिती राजगुरु, अनिता मोरे, आशा मुळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा तर मुलगी दिव्याला तेवत ठेवणारी पणती आहे. तसेच स्ञियांचा आदरपुर्वक सन्मान केला पाहिजे तसेच समाजपरिवर्तनीय बदल घडला पाहिजे.
अध्यक्षीय समारोपात सौ. शैलाताई इंगळे म्हणाल्या, साविञीबाई फुलेंच्या कार्यकर्तूत्वातून आपण बोध घेतला पाहिजे. आजच्या तंञज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोनचा वापर योग्य कारणासाठी व मर्यादित केला पाहिजे. तसेच ध्येय प्राप्तीसाठी परावर्तीत न होता एकनिष्ठ राहिले पाहिजे. शेवटी त्यांनी ‘साविञीमाई तुझ्यामुळे माझ्या जगण्याला आणि असण्याला अर्थ आला, ही कविता सादर केली.
कार्यक्रमाचे सूञसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख हनुमंत घाडगे यांनी केले तर आभार व्यक्त करताना राहुल गदळे यांनी ‘पोरी’ ही कविता सादर करुन आज या इंटरनेटच्या युगात गावातल्या पोरी हरवल्याची खंत व्यक्त केली.
