गौतम बचुटे/केज :- माजलगाव येथील एका शिक्षकाची पत्नी माहेरी जात असताना मस्साजोग ते येळंब घाट दरम्यान प्रवासात तिचे एसटी बस मध्ये बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि ८ डिसेंबर रोजी समता नगर, माजलगाव येथें राहात असलेले शिक्षक निळकंठ चव्हाण यांची पत्नी सौ. उषा चव्हाण या त्यांच्यात माहेरी येळंबघाट येथे जात असताना; केज येथून त्या लातूर-औरंगाबाद बस मध्ये प्रवास करीत होत्या. त्यांच्या सोबतच्या कपड्याच्या बॅगमध्ये त्यांनी एका डबीत त्याचे मिनी गंठन, ठुशी व वेळ हे सोन्याचे दागिने ज्याची किंमत ४७ हजार ३५० रु चे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. त्यांच्या सोबत त्यांच्या सीटवरून दोन अनोळखी महिला देखील प्रवास करीत होत्या. सायंकाळी सुमारे ७:२० वा. केज पासून काही अंतरावर मस्साजोग येथे एसटी बस प्रवाशांना चहापाणी पिण्यासाठी एका हॉटेलवर थांबली असताना; त्या लघु शंकेसाठी त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या एका अनोळखी महिले सोबत खाली उतरल्या. चहापाण्या नंतर बस सुरू झाली व त्या रात्री ८:४० वा येळंब घाट येथे पोहोचल्या. घरी पोहोचल्या नंतर त्यांनी बॅगेतील कपडे काढून पाहिले असता त्यांनी बॅगेत ठेवलेली दागिन्यांची डब्बी आढळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून न आल्यामुळे दि. १० डिसेंबर रोजी त्यांनी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५७०/२०२३ भा. दं. वि. ४७९ नुसार अज्ञात महिलांच्या विरुद्ध ४७ हजार ३५० रु. चे दागिने चोरल्याची तक्रार दिली आहे
या प्रकरणी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे पुढील तपास करीत आहेत.