पंधरावर्षीय मुलाचा कोयत्याने वार करून खुन
22 वर्षीय चुलत चुलता पोलिसांच्या ताब्यात
वार्ताहर– सुधाकर पोटभरे
वडवणी पासून दहा ते पंधरा किलोमिटर अंतरावर असलेल्या पिंपरखेड येथील मंदिराच्या मागील बाजूस एका पंधरा वर्षीय मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे गावातील काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने बीड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सदर मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मयताच्या चुलत चुलत्याला ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, मुळ पिंपळनेर येथील रहिवाशी असलेले शिंदे कुटूंब सध्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे वास्तव्यास आहे. बुधवारी सायंकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान गावातीलच मंदिराच्या मागील रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मुलगा गावातील काही लोकांना दिसल्यानंतर त्याला तातडीने बीड येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या मुलावर उपचार सुरू असताना त्याची ओळख मात्र पटलेली नव्हती परंतू गावात चर्चा झाल्याने हा मुलगा कोण याचा उलगडा झाला. सुरज श्रीकृष्ण शिंदे (वय 15) असे त्याचे नाव निष्पन्न झाले परंतू बेशुद्ध अवस्थेतील सुरज याच्यावर उपचार सुरू असतानाच रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यु झाला. सुरज याच्यावर कोयत्याचे वार करण्यात आले होते. डोक्यात एक वार खोलवर गेला होता. या वारामुळे मेंदुला दुखापत झाली होती. दरम्यान घटनेची माहिती समजल्यानंतर माजलगाव येथील सहाय्यक पोलिस अधिक्षक धिरजकुमार बच्चु, वडवणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुडे यांनी घटनास्थळी भेट देवून या प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले होते.
दरम्यान गुरूवारी (दि.24) सुरज याच्या खुन प्रकरणी त्याचाच चुलत चुलता असलेल्या गणेश अर्जुन शिंदे (वय 20) याला वडवणी पोलिसांनी देवडी फाटा येथुन ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ सि.के.माळी, विलास खरात, बी.टी.राऊत, महेश गर्जे, लिंबराज जाधव यांनी गणेशला ताब्यात घेतल्यानंतर आता या खुनामागील कारण समोर येईल.