मधून एका गुरुजींचे चक्क टिप्परच गेले चोरीकेजला..!
गौतम बचुटे/केज :- मोटार सायकलींचा चोरीच्या घटना तर सतत घडत असतात परंतु आता केज मधून चक्क एका शिक्षकांचे एक दहा चाकी अवजड टिप्परच चोरीला गेले आहे.
अमोल तुळशीराम भंडाणे हे शिक्षक असून ते शिक्षक कॉलनी केज येथे राहतात. त्यांच्या मालकीचे निळ्या रंगाचे टाटा मोटर्स कंपनीचे दहा टायरचे टिप्पर क्र. (एम एच १४/डी एम २९५२) आहे. दि. २२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या टिप्परचा चालक विष्णु देशमुख व अमोल भंडाणे यांनी त्यांचे टिप्पर हे केज ते बीड रोडवरील होंडा शोरूमच्या पुर्वेस शिक्षक कॉलनी, केज येथे उभे केले. टिप्पर चालक विष्णू देशमुख हा त्याचे गावी सारणी ता. केज येथे गेला आणि अमोल भंडाने हे शिक्षक कॉलनीत त्यांचे घरी गेले. त्यानंतर दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:०० वा. च्या सुमारास अमोल भंडाने यांनी सदर ठिकाणी जावुन पाहिले असता टिप्पर दिसुन आले नाही. त्या नंतर चालक विष्णु देशमुख यास बोलावुन घेवुन टिप्परचा केज शहरामध्ये व इतर ठिकाणी जावुन शोध घेतला असता सदर टिप्पर मिळुन आले नाही. त्यांनी केज, धारूर, तेलगाव व इतर ठिकाणी जावुन दिवसभर टिप्परचा शोध घेतला परंतु टिप्पर मिळुन आले नाही. म्हणून अमोल भंडाने यांच्या तक्रारी नुसार केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ५३६/२०२२ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.
———–