केजमध्ये बुलढाणा अर्बन बँक बंद होणार असल्याच्या अफवेने खळबळ; खातेदारांची मोठी गर्दी
केज (दि. ३० डिसेंबर):
बुलढाणा अर्बन बँक बंद होणार असल्याची अफवा शहरात पसरल्याने केज येथील बँक शाखेत आज खातेदारांची मोठी गर्दी उसळली. अचानक पसरलेल्या या अफवेमुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी आपले पैसे व सोने सुरक्षिततेच्या दृष्टीने काढून घेण्यासाठी बँकेत धाव घेतली आहे.
बुलढाणा अर्बन बँक गोल्ड लोन सुविधा देत असल्याने अनेक खातेदारांनी आपले सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. बँक बंद होणार या चर्चेमुळे सोने सोडवून घेण्यासाठी पैसे भरावे लागणार असल्याची चिंता अनेक ठेवीदारांना सतावत आहे. सध्या हाताशी पैसे नसल्याने अनेक नागरिक तणावात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बँक व्यवस्थापन सतर्क झाले आहे. बँक मॅनेजर व सर्व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत बँकेत थांबून व्यवहार सुरळीत सुरू ठेवत आहेत. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. खातेदारांनी संयम बाळगून रांगेत उभे राहून व्यवहार करावेत व गोंधळ करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, ही केवळ अफवा असून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ठेवीदारांना स्पष्ट माहिती व दिलासा द्यावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र, बँक बंद होण्याच्या चर्चेमुळे ठेवीदारांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण कायम आहे.
