मांजरा धरण ८२.७८% भरले !
दर तीन तासाला धरणाच्या पाणी पातळीचे अपडेट्स;
गौतम बचुटे/केज :-
बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्वाचे समजले जाणारे मांजरा नदीवरील मांजरा प्रकल्प हा आज सकाळी ९.०० वाजता मिळालेल्या माहिती नुसार ८२.७८ टक्के भरला असून धरण पूर्ण भरायला केवळ ०.७२ मीटर बाकी असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
या वर्षी झालेल्या मे महिन्यातील मान्सून पूर्व पावसाने मांजरा प्रकल्पात २५ टक्के जलसाठा होता. मात्र त्या नंतर १४ ऑगस्ट पर्यंत मांजरात अवघा ३६ टक्केच एवढा जलसाठा होता. त्यामुळे अर्धा पावसाळा संपत आलेला असला तरी आता धरण भरते की नाही ? अशी शेतकरी आणि बारमाही सिंचन असलेले बागायतदार शेतकऱ्यांना काळजी लागली होती.
मात्र दि. १४ आणि १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ तासात झालेल्या दमदार पावसाने मांजरा आता ८२.७८ टक्के भरले आहे. अशी अधिकृत माहिती आज सकाळी ९:०० वाजता मिळालेल्या ताज्या माहिती नुसार आहे. धरणाच्या पाणी पातळीची माहिती प्रत्येक ३ तासांनी देण्यात येत आहे.
_______________
एकाच दिवसात ३६ टक्क्यावरून ८२ टक्क्यांवर पाणी पातळी :- अवघ्या एकाच दिवसात पडलेल्या पावसाने मांजराची जिवंत पाणी साठ्याची पातळी ही ३६.७० टक्क्या वरून ८२.७८ अशी वाढलेली आहे.
_________________
धरण पूर्ण भरायला फक्त पाऊण मीटर बाकी ! :- धरणाची एकूण पातळी ही ६४२.३७ मीटर आहे. आता त्या पैकी ६४१.६५ मीटर एवढे भले असल्याने आता धरण भरायला केवळ ०.७२ मीटर म्हणजे पाऊण मीटर पेक्षा कमी बाकी आहे.
________________
मांजरा प्रकल्पातील सद्यस्थिती :- आज सकाळी ६:०० वाजता मांजरा प्रकल्पाच्या अधिकाऱ्याकडून जलसाठ्या बाबत मिळालेल्या अधिकृत माहितीद्वारे धरणाची पाणी साठवण क्षमता ही २२४.०९३ दशलक्ष घन मीटर असून सध्या धरणात १९३.६१३ दश लक्ष घन मीटर पाणी आहे. मांजरा नदीपात्रातून येणाऱ्या पाण्याची आवक ही ५.५६७ दश लक्ष घन मीटर आहे.
_________________
लवकरच धरणाचे दरवाजे उघडले जातील ! :- मागील वर्षी २०२४ या वर्षात १६ ऑक्टोबर मध्ये ही धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ४ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात या होता. आता ऑगस्ट महिन्याच्या अर्ध्यातच धरण ८२ टक्क्याच्या जवळपास भरत आल्याने लवकरच हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून धरणाचे दरवाजे देखील उघडले जातील.
