परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक पूजा पवार यांची धाडसी कारवाई
गौतम बचुटे/केज :- परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक पूजा पवार यांनी केज तालुक्यातील सुर्डी येथे धाडसी कारवाई करून शेतातील जनावरांना चारा म्हणून वापरण्यात येणाऱ्या घासाच्या पिकात शेतकऱ्यांनी जोपासलेला ३ लाख ९४ हजार रु. किमतीचा गांजा जप्त केला होता. त्यातील आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २३ जून रोजी सहाय्यक जिल्हा पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, माळेगांव ता. केज येथील शिवारात सिद्धेश्वर तुकाराम ठोंबरे (रा. सुर्डी ता. केज) यांनी त्यांच्या मालकीच्या शेत सर्व्हे नंबर ८४ मधील शेतातील जनावरांना चाऱ्यासाठी वापरल्या जात असलेल्या घासाच्या पिकात गांजाची झाडे जोपासली आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक पूजा पवार यांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे आणि पोलिस हवालदार बालासाहेब डापकर, पोलिस नाईक शेंडगे पोलिस नाईक अनिल मंदे, पोलिस नाईक राजू गुंजाळ, पोलिस नाईक दिलीप गित्ते यांनी सरकारी सक्षम अधिकारी नायब तहसिलदार अशोक भंडारे यांच्या समक्ष आणि ग्रामसेवक व कृषि अधिकारी यांच्यासह पंच म्हणून उपस्थित असलेले ग्राम विस्तार अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्या समक्ष दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. धाडीत पोलिसांना सिद्धेश्वर तुकाराम ठोंबरे रा. सुर्डी तालुका केज यांच्या माळेगांव शिवारातील गट नं. ८४ मध्ये धाड टाकली. त्यावेळी त्यांना जनावरांना खाऊ घालण्याच्या घासाच्या पिकात सुमारे ८ ते ९ फूट उंचीची गांजाची झाडे जोपासली असल्याचे आढळून आले होते.
पोलिसांनी ती सर्व झाडे जप्त करून त्याचे वजन केले असता त्याचे वजन १९.७०० कि. ग्रॅ. झाले. जप्त केलेल्या गांजाच्या झाडांची त्याच्या पाल्यासह किंमत ही ३ लाख ९४ हजार रु. एवढी आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून सिद्धेश्वर ठोंबरे याच्या विरुद्ध गु. र. नं. १६४/२०२५ नुसार गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(सी), २० (बी) (२) अन्वये युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी आरोपी सिद्धेश्वर ठोंबरे याला दि. २४ जून रोजी केज येथील न्यायालयात हजर केले असता आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.