महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या कीर्तनाने सांगता:
विविध मान्यवरांची उपस्थिती;
केज(प्रतिनिधी )
तालुक्यातील प्रति देहू म्हणून प्रसिद्ध असणारे श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथील बीजोत्सवाला भाविकांचा जनसागर लोटला. दि.१६ मार्च वार रविवार रोजी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या काल्याचे किर्तनाने बीजोत्सवाच्या सोहळ्याची सांगता झाली. श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह. भ .प .महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचे आयोजन केले होते. या निमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह. भ. प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अंबासाखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर, कॉग्रेस जि.अ. राहुल भैय्या सोनवणे, माजी सभापती तानाजी देशमुख, केज पंचायत समितीचे माजी उपसभापती ऋषीकेश आडसकर, हनुमंत काका मोरे, वसंतराव मोरे, माजी जिल्हा परिषद शंकर उबाळे, ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बालासाहेब काकडे, ॲड.गजानन चौगुले, गणेश महाराज भगत, उद्योजक प्रशांत निगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सात दिवसांपासून चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात गाथा पारायण, श्रीमद् भागवत कथा व महाराष्ट्रातील कीर्तनकारांच्या हरिकीर्तनातून प्रबोधन ,सप्ताहात अन्नदान, युवाशक्ती प्रबोधन शिबिरे यासारख्या उपक्रमातून अखंड हरिनाम सप्ताहात रंग चढला. पावनधाम येथे पंचक्रोशीतील जवळपास ४० गावांहून पायी दिंड्यांच्या माध्यमातून हजारो भाविक पावनधाम येथील सप्ताहासाठी आले होते.टाळ, मृदंगाचा गजर करत संत ज्ञानोबा, तुकोबा ,विठोबाच्या नामाच्या गजरात दिंडीने आलेल्या वारकऱ्यांमुळे पावनधामला देहूचे स्वरूप आले होते.
सात दिवस चाललेल्या बीजोत्सवासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी दररोज पंचक्रोशीतील सर्व गावाहून प्रत्येक घरातून माधुकरीच्या स्वरूपात भाकरी येत होत्या,तर दानशूर अन्नदात्यांच्या माध्यमातून इतर अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .सदेह वैकुंठ गमनाच्या दिवशी व काल्याच्या दिवशी पुणे येथील उद्योजक नामदेवराव गोरे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. सात दिवस चाललेल्या कार्यक्रमासाठी श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथील स्वयंसेवकांनी ह. भ. प. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले.