शितलताई लांडगे यांना महाराष्ट्र फाउंडेशन यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा समाजरत्न पुरस्कार जाहीर
केज-
केज येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षा सौ. शितलताई लांडगे यांना महाराष्ट्र फाउंडेशन यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा समाजरत्न पुरस्कार येत्या १६ मार्चला पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे.
सौ. शितलताई लांडगे ह्या सर्वसामान्य कुटुंबातील असून त्या गेल्या दहा वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अनेक विधवा, परितक्ता, गोरगरीब महिलांचे शिक्षण व वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण आणि त्याच बरोबर अनेक महिलांचे उद्योग व्यवसाय उभे करून दिलेले आहेत. त्यांना कित्तेक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले आहे. महिलांचा आर्थिक विकास होण्यासाठी त्या सतत धडपड करीत आहेत. त्याच बरोबर त्यांनी अनुसूचित जाती जमाती या समाजातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महान कार्य त्या करत आहेत. अनेक महिलांचे राहून गेलेले स्वप्न त्यांच्या माध्यमातून साकार होताना दिसत आहेत. महिलांना संघटित करायचे असेल तर त्यांना एकत्रित करावे लागेल म्हणुन बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय घेतला आज त्यांचे २७० महिला बचत गट आहेत.
महीलांची जोडणी करून बचत जमा करणे हाच एक उद्देश न ठेवता त्यांनी त्या प्रत्येक महिलांशी मैत्रीचे, बहिणीचे, मुलीचे आईचे नाते जोडून त्यांच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांचे आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक विकास साधण्याचा वसा हाती घेतला आहे. महिलांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी त्यांनी विविध व्यवसाय उभे करून दिले आहेत. शिवणकाम, केक मेकिंग, कॉम्प्युटर, झाडु बनवणे अशा विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन शेकडो महिलांचे व्यवसाय उभा करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्या महिलांना विविध क्षेत्रात नोकरी मिळवून देण्याचे कार्य सुद्धा त्या या ठिकाणी करत आहेत. आमच्या प्रतिनिधी ला बोलताना त्या म्हणाल्या की, खरं सांगायचं म्हटलं तर मी स्वतः बालविवाहाची शिकार आहे. बाल विवाहाचे दोष काय आहेत ते मी स्वतः अनुभवले आहे. जीवनात संघर्ष करीत मी माझे अस्तित्व निर्माण केले आहे. आज समाजात माझी सामाजिक कार्यकर्ती म्हणून ओळख आहे. तसेच माझा मुलगा आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे मी आज एका भावी डॉक्टरची आई आहे. माझ्या आयुष्याचे सार्थक मी स्वतः केले आहे. मी या पुढेही हजारो महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रवृत्त करेन या पुरस्कारामुळे मला आधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशनचे आभार मानले आहेत.