केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जिनिंग फॅक्टरीवर काम करीत असलेल्या मध्यप्रदेशातील परप्रांतीय मजुराच्या अल्पवयीन मुलीचे अज्ञातांनी अज्ञात कारणासाठी अपहरण करून पळवून नेल्याची घटना घडली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील कृष्णा जीनिंग फॅक्ट्रीरीवर मध्यप्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्यातील बडोनी ता. पुनसा येथील एक जोडपे मजुरीचे काम करीत आहे. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. ते सर्वजण जिनिंग फॅक्ट्रिवर पत्र्याच्या शेडमध्ये राहतात.
दि. १९ डिसेंबर रोजी त्यांची १६ वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी ही दुपारी २:०० वा. सुमारास शौचास गेली. ती परत आली नाही. तिच्या आई वडिलांनी शोध घेवून सुद्धा ती सापडली नाही. म्हणून दि. २३ डिसेंबर रोजी तिच्या वडिलांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्या प्रकरणी गु. र. नं. २७९/२०२४ भा. न्या. सं. १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे स्वतः या प्रकरणी तपास करीत आहेत.