आता संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जाणार लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि बँकेचे पास बुक व मोबाईल क्रमांक तलाठ्याकडे द्यावेत अन्यथा अनुदान बंद होईल — तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आवाहन
आता संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जाणार
लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि बँकेचे पास बुक व मोबाईल क्रमांक तलाठ्याकडे द्यावेत अन्यथा अनुदान बंद होईल
— तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आवाहन
गौतम बचुटे/केज –
केज तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड, बँकेचे पास बुक व मोबाईल नंबर हे त्यांच्या तलाठ्याकडे जमा करण्याचे आवाहन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले आहे. तसेच सदर कागद पत्रे वेळेत सादर न केल्यास अनुदान बंद होणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे एकुण ६ हजार ९६३ लाभार्थी आहेत. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे एकुण ३१ हजार १६४ लाभार्थी आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई यांचे पत्रा अन्वये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचा योजना निहाय डाटा डीबीटी पोर्टलवर अपलोड करून आधार पडताळणीचे १०० टक्के काम पुर्ण करण्या संदर्भात सुचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे गावचे तलाठी यांचे मार्फत वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत. तरी सुद्धा बरेचसे लाभार्थ्यांनी अद्याप पर्यंत त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक व मोबाईल क्रमांक सादर केले नाहीत. अशा लाभार्थ्यांनी सदरील कागदपत्रे आपल्या गावचे तलाठी यांना दि. २५ डिसेंबर पर्यंत सादर करावीत. अन्यथा माहे जानेवारी २०२५ पासून त्यांचे अनुदान उपलब्ध होणार नाही. यापुढे सर्व संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात थेट अनुदान उपलब्ध होणार आहे. याची सर्व संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले आहे.