शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध
केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन
केज-
महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये मनुस्मृति आणि रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील श्लोकांचा समावेश करण्यात आल्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली आहे. या निर्णयाला विरोध म्हणून केज तालुका जिजाऊ ब्रिगेडने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीला विरोध करणारे निवेदन बीड जिल्हा अध्यक्षा राधाताई रामदास सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली केज येथे तहसील कार्यालयातील पेशकार नन्नवरे यांना निवेदन दिले.
मनुस्मृति हा हिंदू धर्मातील समस्त बहुजन समाजांचा अपमान करणारा आणि त्यांना हीन लेखनारा ग्रंथ आहे. तसेच मनुस्मृतीने हिंदु धर्मातील समस्त स्त्रियांना जनावरापेक्षाही खालचा दर्जा दिलेला असून स्त्रियांना सर्व प्रकारचे हक्क आणि अधिकार नाकारले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांना सुद्धा मनुस्मृतीचा आधार घेऊनच प्रचंड, विरोध झालेला आहे. सावित्रीबाई फुले यांनी सुरू
केलेल्या शैक्षणिक कार्यालासुद्धा मनुस्मृतीचा आधार घेऊनच प्रतिगाम्यांनी विरोध केलेला होता. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन रायगडाच्या पायथ्याशी महाडला मनुस्मृतीचे जाहीर दहन केले होते.
अशा विषमतावादी ग्रंथातील श्लोक विद्यार्थ्यांना शिकवून त्यांच्या मनात जातीयवाद आणि विषमता सरकारला निर्माण
करायची आहे का? असा प्रश्न जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी या निवेदनाद्वारे शासनाकडे विचारला आहे. तसेच रामदास स्वामीचा ‘दासबोध’ हा ग्रंथसुद्धा विषमता निर्माण करणारा असून त्या ग्रंथामध्ये गुरूंची लक्षणे’ या अध्यायात बहुजन समाजाला अध्ययन आणि अध्यापन करण्याचा अधिकार नाकारलेला आहे, त्यामुळे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने या दोन्ही ग्रथांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याला जाहीर विरोध करण्यात येत आहे. तुकोबांची अभंगगाथा, राष्ट्रसंतांची ग्रामगीता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करावे अशी मागणी निवेदनात केली आहे. सरकारने आमच्या मागणीचा ताबडतोब विचार करुन अभ्यासक्रमातून मनुस्मृती आणि दासबोध ताबडतोब हटवावे. अन्यथा जिजाऊ ब्रिगेडला शिक्षण विभागावर मोर्चा नेऊन संपूर्ण महाराषट्रभर तीव्र आंदोलन उभे करेल, असा ईशाराही बीड जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या बीड जिल्हाध्यक्ष राधाताई रामदास सपकाळ , अविधा बाळासाहेब शिंदे , आम्रपाली संजय सोनवणे,
यांच्यासह इतर माता-भगिनी उपस्थित होत्या.
