केज तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करा
*रिपाइं*
केज :-
अवकाळी.पाऊस आणि वादळ वाऱ्यात केज तालुक्यात अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळित झालेले आहे. त्याची दखल केज तालुका रिपाइंचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी घेवून विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी विज वितरण कंपनीकडे केली आहे.
मागील आठवड्यात केज तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे केज तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त होवून वीज वाहक तारा तुटल्या तर विद्युत रोहित्र देखील खाली जमिनीवर पडून प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे तालुक्यातील काही गावांचा विद्युत पुरवठा हा मागील आठवड्यातून खंडित झालेला आहे. दरम्यान तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती आणि पाणी टंचाई असताना गुरा-ढोरांना आणि माणसांना पिण्याचे पाणी मुश्किल झाले असून त्यात खंडित विद्युत पुरवठ्यामुळे निर्जळीचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे दि. २७ मे रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे आणि शहराध्यक्ष भास्कर मस्के यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीचे उपअभियंता यांच्याशी चर्चा करून खंडित वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, शहराध्यक्ष भास्कर मस्के यांच्यासह केज तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, तालुका उपाध्यक्ष विकास आरकडे, जेष्ठ नेते दिलीपराव बनसोडे, हरीश गायकवाड यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.