*मांजरा नदीवरील जुना पूल व रस्ता दुरुस्तीचे काम दोन दिवसात सुरू करण्याचे अल्टीमेटम*
*आदार नमिता मुंदडा यांच्या मागणी नंतर मेगा कंपनीला आदेश*
*अनेक वर्षां पासून रस्ता दुरुस्त न करणाऱ्या मेगाला दंड ठोकून कारवाई करायला हवी*
*प्रसिद्धी माद्यमांमुळेही बदनामी होत असल्याचा केला उल्लेख!*
गौतम बचुटे/केज :- गेली अनेक वर्ष पासून केज-कळंब दरम्यानच्या मांजरा नदीच्या पुलाचे काम सुरू असताना ते अद्यापही पूर्ण झाले नसल्याने या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असताना सरकारला न जुमानता या महामार्गाचे काम करीत असलेली मेगा कंपनीने जुना रस्ता दुरुस्त न करता अनेकांची गैरसोय केली. त्या बद्दल केज अंबाजोगाई मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी तक्रार केल्या नंतर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने जुना पूल रस्ता आणि ॲप्रोचेस तात्काळ दुरुस्त करून देण्याचे आदेश मेगा कंपनीला दिले आहेत.
खामगाव-सांगोला महामार्ग क्र ५४८-सी या वरील केज ते कुसळंब दरम्यान आणि केज-कळंब रस्त्यावरच्या मांगवंडगाव फाट्या जवळच्या मांजरा नदीवरील नवीन पुलाचे रस्त्याचे सुमारे दोन ते अडीच की मी रस्त्याचे व नवीन पुलाचे काम सुमारे पाच वर्षा पेक्षा जास्त कालावधी पासून रखडलेले आहे. हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित झालेला आहे. या टप्प्या दरम्यानचे पुलाचे व रस्त्याचे काम हे मेगा इंजिनियरिंग व इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड करीत आहे. परंतु नवीन पुलाचे व रस्त्याचे काम पूर्ण होई पर्यंत या कंपनीने पर्यायी रस्ता म्हणजेच सध्या वापरात असलेला जुना पूल आणि त्यावरील दोन्ही बाजूचा रस्ता याची देखभाल व दुरुस्ती केलेली नसल्याने या ठिकाणी अनेक अपघातात व चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. त्या बाबत प्रसिद्धी माद्यमातून अनेक वेळा आवाज उठविला आहे. तसेच केज विकास संघर्ष समितीने ही अनेक आंदोलने केली आहेत. परंतु मेगा कंपणी किंवा प्रशासनाने त्याची दखल न घेता थातुरमातुर स्वरूपाचे काम करीत होते.
दरम्यान केज अंबाजोगाई मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनीही वरिष्ठ पातळी वरून या गैरसोयीची दखल घेत अधीक्षक अभियंत्यांना तक्रार करीत पत्र देताच त्यांनी काम करणाऱ्या मेगा कंपनीला पत्र देऊन नवीन पूल आणि त्याच्या ॲप्रोचेस काम पूर्ण होई पर्यंत जुन्या पुलाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता आणि ॲप्रोचेसचे काम तात्काळ दोन दिवसांत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काम सुरू झाल्याचे फोटो देखील वरिष्ठांना पाठविण्याचे म्हटले आहे.
———————
*रस्ते विकास महामंडळाने घेतली बातम्यांचीही दखल :-* मेगा कंपनीला रस्ता दुरुस्ती संदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रस्त्यामुळे गैरसोयी संबंधीच्या प्रकाशित झालेल्या बातम्यांमुळे रस्ते विकास महामंडळ यांची बदनामी होत आहे असा उल्लेखही पत्रात केला आहे.
——————-
*रखडलेल्या कामाला जबाबदार असलेल्या मेगा कंपनीवर कारवाई हवी !:-* गेल्या अनेक वर्षा पासून काम पूर्ण न करू शकलेल्या मेगा कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
——————-
*अनेक ठिकाणी कामे अपूर्ण :-* साळेगाव येथेही संरक्षक जाळी, नाली, फुटपाथ, पिक-अप प्रवाशी शेड आणि डिव्हायडर वरील पथदिवे यांचे काम अपूर्ण असून ते पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
—–
