केज तालुक्यात एकाच वेळी दोन पेट्रोल पंपायावर दरोडा
युसुफवडगाव आणि बोरीसावगाव येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा !
अवघ्या २५ मिनिटाच्या अंतराने दोन पेट्रोल पंप लुटले !
दोन्ही दरोड्यात चार लाख रु लुटले !
गौतम बचुटे/केज :- युसूफवडगाव आणि बोरीसावरगाव येथील दोन पेट्रोल पंपावर मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा टाकून रोख रक्कम चोरी करून मोटार सायकल वरून पळून गेले. विशेष हे की, दोन्ही पेट्रोल पंपाचे अंतर हे १५ किलोमीटर एवढे असताना अवघ्या २५ मिनिटाच्या अंतराने दोन पेट्रोल पंप या टोळीने लुटून चार लाख रु. रोख रक्कम पळवून नेली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. १६ फेब्रुवारी रोजी ११:२३ वा. च्या सुमारास युसुफवडगाव येथील शिवरुद्र चोपणे यांच्या शुभम पेट्रोलियम सर्व्हिसेस या पेट्रोल पंपावर दोन मोटार सायकल वरून आलेल्या चौघांनी पेट्रोल पंपाच्या कार्यालयाचा काचेचा दरवाजा फोडून मॅनेजरला कुकरी सारख्या धारदार तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवून टेबलच्या ड्रॉवर मधील रोख रक्कम काढून घेतली. तसेच बाहेर पंपावर वाहनात इंधन भरीत असलेल्या कामगारांच्या खिशातील नगदी पैसे काढून घेऊन मोटार सायकल वरून अंबाजोगाईच्या दिशेने पळून गेले.युसूफवडगाव येथील दरोड्यात २५ हजार रु. ची चोरी करण्यात आली आहे. त्या नंतर पळून जात असताना याच रस्त्यावर पुढे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरीसावरगाव येथील विश्वनाथ सोमवंशी यांच्या सोमवंशी पेट्रोल पंपावरही त्यांनी दरोडा टाकला. त्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयाच्या दरवाजाचा काच फोडून मॅनेजरला धारदार शस्त्राचा धाक दाखवून टेबलच्या ड्रॉवरमधील नगदी ३ लाख ७० हजार रु. चोरून पोबारा केला.
या घटनेची माहिती युसुफवडगाव पोलिसांना मिळताच त्यांची दरोडेखोरांचा पाठलाग केला. परंतु अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पसार झाले.
या दोन्ही पेट्रोल पंपावरील दरोड्याचा युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे करीत आहेत.
—————————————————
दरोडेखोर सीसीटीत कैद :- या दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून मोटार सायकल वरून आलेल्या दरोडेखोरांनी जीन्स पॅन्ट व अंगात हुडी व कान टोपी घालून चेहरा स्कार्फ आणि मफलरने बांधलेला असल्याने चेहरा ओळखू येत नाही.
————————————————–
घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि ठसे तज्ज्ञांची भेट :- या दरोरोड्याचा तपास लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राडकर आणि पोलीस उपनिरीक मुरकुटे यांच्या पथकाने भेट देऊन दरोडेखोरांचा तपास घेत आहेत. तसेच ठसे तज्ज्ञ श्रीमती साळुंके यांनी तेथील वस्तू आणि काचेवरील दरोडेखोर यांनी स्पर्श केलेलेल्या वस्तूवरील ठसे हस्तगत करून करून दरोडेखोरांची माहिती काढीत आहेत.
————————————————–
कदाचित फोन काही मिनिटा पूर्वी संपर्क झाला असता तर बोरीसावगावचा दरोडा टळला असता ! :- रात्री ११:२३ मिनिटांनी युसुफवडगाव येथील पेट्रोल पंपावर दरोडा पडल्या नंतर दरोडेखोर अंबाजोगाईकडे पळून जात असल्याने शिवरूद्र चोपणे यांनी बोरीसावरगाव येथील पंपाचे मालक विश्वनाथ सोमवंशी यांना फोन करून माहिती देऊन सावध केले. त्या नंतर विश्वनाथ सोमवंशी यांनी तात्काळ त्याने पंपावरील मॅनेजरला फोन केला परंतु मॅनेजरने त्यांचा फोन घेतला नाही. कारण त्याच वेळी दरोडेखोरांनी मॅनेजरला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याशी झटापट करीत होते.
—————————————————-
अवघ्या सात मिनिटात दोन दरोडे टाकून दरोडेखोर फरार :- युसुफवडगाव येथे पेट्रोल पंपात प्रवेश केल्या नंतर डतोडेखोरांनी अवघ्या चार मिनिटात पैसे घेऊन पोबारा केला. तर त्या नंतर बोरीसावरगाव येथे अवघ्या तीन मिनिटात दरोडा टाकून पळून गेले. म्हणजे दोन्ही पेट्रोल पंप अवघ्या सात मिनिटात लुटून ३ लाख ९५ हजार रु. लुटून नेले.
————————————————-
पेट्रोल पंप चालकात दहशत :- एकाच रात्रीत दोन पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याने पेट्रोल पंपचालक आणि कामगाराच्या दहशत पसरली आहे. केज मधील काही पेट्रोलपंप चालकांनी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची भेट घेऊन रात्रीची गस्त वाढविण्याची विनंती केली आहे.
————————————————-
