केजच्या नाट्यगृहाचे काम तात्काळ सुरू करा : मागणीसाठी शुक्रवारी केविसंस साबांविला कुलूप ठोकणार !
केज: केजच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहासाठी सतत पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष कामासाठी चालढकल केली जात असल्याने केज विकास संघर्ष समितीने येत्या शुक्रवार दि 9 फेब्रुवारी रोजी केजच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कुलुप ठोकण्याचा इशारा दिला आहे. केजच्या नाट्यगृहासाठी पुरेशी जागा व निधी उपलब्ध होऊन कांही महिने लोटले आहेत तरीही प्रशासनाच्या व संबंधित यंत्रणेच्या बेजबाबदार व निष्क्रिय मानसिकत्यामुळे अद्याप या कामाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी टेंडर प्रक्रिया व कार्यादेश काढला जात नाही. समिती या प्रश्नावर गेली दहा वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. यापूर्वी या प्रश्नावर समितीने पाठपुरावा केला असता लोकप्रतिनिधी व प्रशासन जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगत असत. आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या काळातही सात कोटींचा निधी मंजूर झाला होता मात्र जागेअभावी तो निधी परत गेला. त्यानंतर जुने पोलीस स्टेशन ची जागा आता हस्तांतरित होऊन केज नगरपंचायत कडे आली आहे. आता आमदार नमिताताई मुंदडा यांच्या काळातही पुरेसा निधी आलेला असताना नाट्यगृहाच्या प्रत्यक्ष बांधकामाला मात्र सुरुवात झालेली नाही. नाट्यगृहाअभावी केजच्या कालाक्षेत्र व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रम उघड्यावर घेणे शक्य होत नाही. कार्यक्रमाला उपद्रवी घटकांपासून सुरक्षितता राहत नाही, व्यत्यय येतो. त्यामुळे केजचे सांस्कृतिक क्षेत्र मागे पडत आहे. नाट्यगृह उपलब्ध झाल्यास येथील कलाकारांना रंगमंच उपलब्ध होऊन त्यांच्या कलेला वाव मिळेल. लोकप्रतिनिधी व प्रशासन समितीला आंदोलन करण्याची गरज नसल्याचा ‘उपदेश’ करतात. मात्र महिनानुमाहिने व वर्षे लोटली तरी कामे होत नसल्याने समितीला राहून राहून आवाज उठवावा लागतो. येत्या एक महिन्यात नाट्यगृहाचे काम सुरू न झाल्यास पुढे लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेत अडकून हे काम बारगळले जाऊ शकते. यासाठी आता समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. किमान लोकनेनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नावाने मते मागणाऱ्या सर्वच राजकिय पुढारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे सहकार्य करून हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी असे आवाहनही समितीच्या वतीने हनुमंत भोसले, नासेर मुंडे, विक्रम घुले, महेश जाजू, शेषराव घोरपडे, जालिंदर देशमुख, संपत वाघमारे इत्यादींनी केले आहे.