आंदोलनस्थळा साठी केज तहसीलदारांकडे ‘केविसंस’ ची मागणी
केज: केज तालुक्यातील जनतेला आपल्या विविध मागण्यां व समस्यां प्रशासन पातळीवर सोडवण्यासाठी व्यक्तिगत अथवा संघटनात्मक उपोषणे, धरणें किंवा घंटानाद यासारखी आंदोलने केज तहसीलदार कार्यालयासमोर वर्षभर वेळोवेळी केली जातात. मात्र केज तहसील कार्यालयासमोर निश्चित जागा नसल्याने अडचण होत होती. सध्या ही आंदोलने केज तहसील कार्यालयासमोर महामार्गालगत मुख्य प्रवेशद्वाराच्या लगतच्या पूर्वेकडील जागेवर केली जातात. आता यापुढे मुख्यप्रवेशद्वाराजवळ महामार्गालगतची 15 बाय तीस फूट जागा ” केज तालुका संघर्ष आंदोलन स्थळ’ या नावाने आरक्षित करून आंदोलन कर्त्यासाठी दिली जावी अशी मागणी केज विकास संघर्ष समितीने केज तहसीलदार यांच्याकडे केली आहे. तहसील कार्यालयाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास समिती लोकसहभागाने ही जागा तयार करणार आहे. तसेच या जागेवर यापुढे कोणत्याही व्यवसायिकांना आपले तात्पुरते व्यवसाय करता येणार नाहीत व कोणी केल्यास तहसील कार्यालयाने कठोर कार्यवाही करावी अशी मागणीही समितीने केली आहे. केज तहसीलदार महोदयांनी यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन समितीला दिले आहे.
