धनेगाव येथील मुकुंदराज उद्यान निर्मिची मराठवाडा विकास परिषद, केजची आ.नमिताताई मुंदडा यांच्याकडे मागणी
केज-
धनेगाव ता.केज येथे नियोजित आद्यकवी मुकुंदराज उद्यान लवकरच मार्गी लागेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी व्यक्त केला.मराठवाडा जनता विकास परिषद शाखा केजच्या वतीने धनेगाव येथे पर्यटनाच्या दृष्टीने शासनाच्या मालकीचे उद्यान उभारावे असे केज मतदार संघाच्या आमदार श्रीमती नमिता ताई मुंदडा यांना उद्देशून लिहिलेले निवेदन मा.नंदकिशोर मुंदडा यांना केज येथे सादर केले असता त्यांनी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करताना विश्वास व्यक्त केला.या संदर्भात नमिता ताई मुंदडा यांनी शासनासोबत केलेला पत्रव्यवहार आणि विधान मंडळामध्ये मांडलेल्या प्रश्न संदर्भातील कागदपत्रे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडे सादर केली.
धनेगाव येथील हा प्रकल्प मार्गी लावून मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने माननीय नंदकिशोर मुंदडा यांना करण्यात आले. मांजरा धरण हे जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण आहे त्याची साठवणूक क्षमता 371.27 दशलक्ष घनमीटर आहे तसेच धनेगाव परिसरात शासनाची सुमारे 32 हेक्टर जमीन सुद्धा उपलब्ध आहे. धनेगाव प्रकल्प बीड लातूर आणि उस्मानाबाद या तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा दुवा आहे त्यामुळे धनेगाव येथे पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाप्रमाणे सुसज्ज सार्वजनिक उद्यान तयार केल्यास तिन्ही जिल्हे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होतील असे निवेदनात म्हटले आहे.
शासकीय विश्रामगृह केज येथे सदरील निवेदन सादर करतेवेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे केजचे अध्यक्ष श्री.गदळे जी.बी. कार्याध्यक्ष श्री.कल्याणकर प्रदीप,कोषाध्यक्ष श्री.राऊत रामराव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.सूर्यवंशी महादेव,भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नेहरकर वासुदेव,मराठवाडा साहित्य परिषद शाखा केजचे अध्यक्ष श्री.गदळे राहुल, पत्रकार श्री.कुलकर्णी अभय,मराठवाडा शिक्षक संघाचे सहसचिव श्री.जयपाल मस्के,अक्षर सेवाभावी संस्थेचे सचिव श्री.विक्रम डोईफोडे,स्वामी विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक श्री.तिडके बाळासाहेब,कृष्णा अर्बन बँकेचे समन्वयक तथा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी श्री.दादाराव जमाले,प्रशिक संस्थेचे अध्यक्ष श्री.नंदकुमार मस्के,माजी नगरसेवक श्री.कपिल मस्के,स्वामी विवेकानंद प्रा.शाळेचे मुख्याध्यापक,श्री.वसंत शितोळे, खदीर खुरेशी यांसह केज शहर व परिसरातील अनेक कार्यकर्ते,शिक्षक व व्यापारी यांची उपस्थिती होती.याचवेळी मा.नंदकिशोर मुंदडा यांना नुकताच समाजभूषण पुरस्कार मिळाल्याचे औचित्य साधत त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
