गावातील अंधार दूर होणार का !
विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ;
गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करा म्हणून सरपंचासह ग्रामस्थांचे उपोषण
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील जानेगाव येथे सुमारे दीड महिन्यापासून गाव अंधारात असल्याने गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महिला सरपंचासह गावकरी उपोषणाला बसले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील बनकरंजा येथे मागील काही दिवसां पासून विद्यूत रोहित्र जळाल्याने गावातील वीज पुरवठा बंद असल्याने दळण, पाणी या सारख्या मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच गावकऱ्यांनी बिले देखील भरलेली आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा असताना अंधारात विद्यार्थ्यांनी अभ्यास तरी कसा करावा ? अशा अडचणी आहेत. तसेच वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी रोहित्र बदलण्यासाठी गावात आणून ठेवले परंतु ते बसविलेले नाही. म्हणून व्यथित होऊन महिला सरपंच आम्रपाली ओव्हाळ यांच्यासह ग्रामस्थांनी विज वितरणच्या कारभाराविरूद्ध दि. २ मार्च रोजी केज तहसील कार्यालया समोर उपोषण केले. उपोषणाला तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांनी भेट देऊन ग्रामस्थांची अडचण लक्षात घेतली आहे.
दरम्यान तहसीलदार डी. सी. मेंडके यांच्या आदेशावरून विज वितरणचे कनिष्ठ अभियंता मुंडे आणि म्हसुलचे नन्नवरे यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन त्यांना तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले.