हा सत्कार नव्हें तर गावाने केलेले संस्कार आहेत
प्रोफेसर पुरुषोत्तम देशमुख
केज : आज माझ्या जन्मगावात होत असलेला हा माझा सत्कार हा माझ्यावर गावाने केलेल्या संस्काराचे फलित आहे. या संस्कारामुळेच मी आज इथपर्यंत पोहोंचू शकलो. या गावचा मी सदैव ऋणी राहील’ अशा भावपूर्ण शब्दात प्रोफेसर पुरुषोत्तम विष्णुपंत देशमुख यांनी वरपगावच्या ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले.
केज तालुक्यातील वरपगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने प्रोफेसर पुरुषोत्तम देशमुख यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचारपीठावर वरपगावच्या मठसंस्थानचे मठाधिपती हभप भगवान महाराज शास्त्री, बीडचे प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ भूमिपुत्र डॉ टी एल देशमुख, माजी जिप सदस्य सुरेश तात्या पाटील, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, जेष्ठ नागरिक निळकंठ देवकर, विष्णुपंत देशमुख, बाळासाहेब कवठेकर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा प्रमुख पाहुणे व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पुरुषोत्तम देशमुख यांनी आपल्या आईवडील व परिवाराच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा देताना त्यांनी गावातील नागरिकांची प्रेरणा व सहकार्याबद्दल आदर व ऋण व्यक्त केले. भविष्यात गावासाठी आपले योगदान देणार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. हभप भगवान महाराज यांनी प्रोफेसर पुरुषोत्तम देशमुख यांचे यश हे आमच्यासाठी भूषणावह असल्याचे सांगून त्यांच्या मार्गदर्शनाचा गावच्या पुढील पिढीला लाभ होईल असे मत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
डॉ टी एल देशमुख यांनी गावचे ऐक्य अबाधित ठेवण्याचे आवाहन करून निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी पुरुषोत्तम देशमुख यांची विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुखपदी झालेली निवड ही बाब आमच्यासाठी अभिमानाची बाब असून वरपगावच्या पुढील पिढीच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचे सांगितले.
उपसरपंच ऍड बाबुराव देशमुख यांनी गावकऱ्यांना अपेक्षित विकासकामे करून आम्ही चांगला आदर्श निर्माण करू असा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमात निवडून आलेल्या सदस्यांच्या वतीने ऍड बाबुराव देशमुख यांनी या निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व सदस्यांच्या सत्कार करून निवडणुकीतील कटुता संपली असल्याचे दाखवून दिले. यावेळी केशव वायबसे, दिलीप बनसोडे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशांत खंदारे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
